खरेदी उत्सवाने गुढीपाडवा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:11+5:302021-04-14T04:21:11+5:30

गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना सुरू झाला आणि तीन महिन्यांचे कडकडीत लॉकडाऊन लागले. त्याच काळातील चैत्रातील पहिला सण असलेला गुढीपाडवा ...

Celebrate Gudipadva with shopping festival | खरेदी उत्सवाने गुढीपाडवा साजरा

खरेदी उत्सवाने गुढीपाडवा साजरा

गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना सुरू झाला आणि तीन महिन्यांचे कडकडीत लॉकडाऊन लागले. त्याच काळातील चैत्रातील पहिला सण असलेला गुढीपाडवा आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी येणारी अक्षय्यतृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी दोन मुहूर्त नागरिकांना घरातच बसून काढावे लागले. यंदा मात्र घराघरावर मांगल्याची गुढी उभारल्यानंतर कोल्हापूरकरांनी आवश्यक साहित्यांची खरेदी केली. दुपारपर्यंत पुरणपोळीसारख्या सुग्रास अन्नाचा आस्वाद घेतल्यानंतर सायंकाळी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ दिसून आली. शासनाचा निर्णय बंदचा आला असला तरी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्ससह राज्यातील सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवायला विरोध केला होता. गुढीपाडवा हा सण पार पडू दे, मग निर्णय घ्या अशी वारंवार मागणी झाल्याने महापालिका व जिल्हा प्रशासनानेही व्यावसायिकांचे म्हणणे समजावून घेतले. त्यामुळे गुढीपाडवा या पहिल्या मुहूर्ताला शहरातील सर्व दुकाने सुरू राहिली.

त्यामुळे सकाळी व दुपारचे ऊन उतरल्यानंतर अशा दोन टप्प्यांत नागरिकांनी विविध साहित्याच्या व वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली.

--

महाद्वार मात्र सुनासुना

एकीकडे गुजरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल गॅलरी, सायकलींची दुकाने येथे ग्राहकांची वर्दळ असताना शहराची मुख्य बाजारपेठ असलेला महाद्वार रोड मात्र सुनासुना होता. इथे मुख्यत: कपडे आणि इमिटेशनची विक्री होते. शिवाय अंबाबाई मंदिर बंद असल्याने ग्राहकांची वर्दळही कमी होती.

---

सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मागणी

गेल्या काही महिन्यांत सोन्याचे वाढलेले दर सातत्याने उतरल्याने मंगळवारी बहुतांश ग्राहकांनी सोने-चांदी दागिन्यांच्या खरेदीवर भर दिला. मंगळवारी सोन्याचा दर ४६ हजार ७५० प्रतिदहा ग्रॅम तर चांदीचा दर ६९ हजार ५०० किलो असा होता. याशिवाय प्रत्येकाची पहिली पसंती असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूममध्ये सर्वाधिक ग्राहकांची वर्दळ होती. या गर्दीमुळे अनेक ठिकाणी कितीही प्रयत्न केला तरी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत होता.

---

गेल्यावर्षी गुढीपाडवा साजराच झाला नाही, यंदा मात्र ग्राहकांनी सोन्या चांदीच्या अलंकारांची खरेदी केली. यात मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या विशेषत: ॲन्टिक फिनिशिंग असलेल्या टेंपल ज्वेलरीला सर्वाधिक प्रतिसाद आहे. चांदीमध्ये ताट-वाटी, पूजेचे साहित्य, पैंजण यांची खरेदी करण्यात आली.

मुरलीधर चिपडे (चिपडे सराफ)

--

यंदा महापालिकेने चांगली साथ दिली. दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची चांगली खरेदी झाली. एलईडी, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीनला अधिक मागणी आहे. खरेदीवर ग्राहकांना शून्य डाऊन पेमेंट, कॅश बॅक अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

मुग्धा नाखे-कुलकर्णी (सारस इलेक्ट्रॉनिक्स)

--

फाेटो नं १३०४२०२१-कोल-गुढीपाडवा खरेदी०१

ओळ : हिंदू नववर्षारंभ व वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापुरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूममध्ये ग्राहकांची अशी गर्दी होती. (छाया : नसीर अत्तार)

--

गुढीपाडवा खरेदी ०२

मोबाइल शोरूममध्ये स्मार्ट फोनच्या खरेदीसाठी तरुणाईची गर्दी ओसंडून वाहत होती. (छाया : नसीर अत्तार)

---

Web Title: Celebrate Gudipadva with shopping festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.