इचलकरंजी : शहरातील मुख्य वर्दळीच्या मार्गांवर काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला गळती, तर काही ठिकाणी ड्रेनेजचे अर्धवट काम. त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांभोवती महिन्याभरापासून बॅरिकेट्स लावून नगरपालिकेने वाहनधारकांना धोकादायक खड्ड्यांची सूचना दिली आहे; परंतु ते काम पूर्ण करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जात नाही. त्यामुळे हे नगरपालिकेचे पाळीव खड्डे आहेत का? त्यांना बुजविण्याऐवजी संगोपन केले जात आहे का, असे संतप्त सवाल वाहनधारकांतून उपस्थित होत आहेत.
शहरातील छत्रपती शाहू पुतळा ते तीन बत्ती चौक या मुख्य मार्गावर मधोमध मोठा खड्डा पडला आहे. तेथे मोठे लोखंडी बॅरिकेट्स लावून ठेवले आहेत, तर शहापूरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरही मोठी खुदाई करून तो खड्डा तसाच सोडला आहे. त्याच्याभोवती मोठमोठे बॅरिकेट्स लावून ठेवले आहेत. संभाजी चौक ते बसस्थानक या मार्गावर प्रांत कार्यालय चौकात मध्यभागी मोठा खड्डा निर्माण झाला होता. तो महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर बुजविला. त्याआधी चांदणी चौकातही असाच प्रकार घडला होता. या सर्व ठिकाणांहून वाहनधारकांना अडथळ्यातून मार्गाक्रमण करावे लागत आहे. थोडी नजरचुकी झाल्यास बॅरिकेट्सना धडकून अपघात होण्याची शक्यता आहे. अशी धोकादायक परिस्थिती असतानाही नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. (फोटो)
२२०१२०२१-आयसीएच-०१
शहापूर रोड
२२०१२०२१-आयसीएच-०२
शाहू पुतळा रोड (सर्व छाया - उत्तम पाटील)