कोल्हापूर : गेल्या दोन तपांहून अधिक काळ मागणी असलेल्या कोल्हापुरात आयटी पार्क होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘लोकमत’मध्ये १ मार्चला आयटी पार्कबाबत प्रसिद्ध झालेली बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात आयटी पार्कचे महत्त्व ओळखत शेंडा पार्कमधील ३४ हेक्टर ३६ गुंठे जमीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. ‘लोकमत’च्या बातमीमुळेच हा निर्णय मंत्रिमंडळाने तातडीने घेतल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.कोल्हापुरात आयटी पार्क व्हावे, ही गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. आयटी पार्कला मंजुरी दिल्यानंतर तेथील जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित होता. जिल्ह्यातील आयटी क्षेत्रातील निर्यात पाहता जिल्हा आयटी असोसिएशनने कोल्हापुरात आयोजित महानिर्यात परिषदेत निर्यातीचे सादीकरण केले.याबाबत ‘लोकमत’ने १ मार्चच्या अंकात “आयटी क्षेत्रात ४,५०० कोटींच्या निर्यात आराखड्याचे ‘आयटॅक’ने केले सादरीकरण” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. ही बातमी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दाखवत जिल्ह्यातील आयटीचे महत्त्व पटवून दिले. या बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाची जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात तातडीने मंजुरी दिली. या मंजुरीमुळे ही जागा आता उद्योग विभागाला दिली जाणार आहे. या विभागामार्फत मोठमोठे प्रकल्प आणून आयटी पार्क विकसित केले जाणार आहे.
कशी होईल प्रक्रिया?कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरातील गट नंबर ५८३, ५८७ व ५८८ मधील एकूण ३६ हेक्टर ३६ गुंठे जमीन प्रथमत: महसूल विभागाकडे समर्पित करण्यास मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव आहे. त्यानंतर महसूल विभागाकडे समर्पित केलेल्या जमिनीपैकी ३४ हेक्टर ३६ गुंठे जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आयटी पार्क विकसित करण्यासाठी हस्तांतरित करावी. या जमिनीची कृषिक दराने प्रचलित बाजार मूल्यानुसार परिगणित केलेली संपूर्ण रक्कम वसूल करून भोगवटादार वर्ग- दोन या धारणाधिकाराने कब्जेहक्काने प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी प्रस्तावात नमूद केली आहे.आयटी पार्कसाठी शेंडा पार्कची जागा महत्त्वाचीशेंडा पार्कातील ही जागा मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असून आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आणि शैक्षणिक संस्था विकसित होत आहेत. जवळच शिवाजी विद्यापीठ आणि अन्य नामांकित संस्थाही असल्यामुळे कुशल मनुष्यबळही सहज उपलब्ध होणार आहे. या जागेलगतच २५ एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि २५ एकर जागेवर उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ प्रस्तावित असून नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
‘लोकमत’मध्ये १ मार्चला आयटी पार्कबाबत प्रसिद्ध झालेली बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व मंत्रिमंडळाने तत्काळ शेंडा पार्कमधील आयटी पार्क विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आयटी पार्कमुळे कोल्हापूरसह आसपासच्या पाच-सहा जिल्ह्यांमधील हजारो पात्रताधारक तरुणांना रोजगार मिळणार आहे. - राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ, महाराष्ट्र.या प्रस्तावाच्या मंत्रिमंडळ मंजुरीमुळे ही जागा आता उद्योग विभागाला दिली जाणार आहे. या विभागामार्फत मोठमोठे प्रकल्प आणले जातील. या आयटी पार्कमध्ये मोठमोठ्या कंपन्या येण्यासाठी प्रयत्न करू. कोल्हापूरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री.शेंडा पार्क येथे होणाऱ्या आयटी पार्कमुळे कोल्हापुरातील तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठीच आम्ही या पार्कसाठी पाठपुरावा केला. - अमल महाडिक, आमदार, कोल्हापूर दक्षिण.
Web Summary : Kolhapur's long-awaited IT Park gets the green light! After 'Lokmat' highlighted the project's importance, the government approved land allocation in Shenda Park. This decision promises significant job creation and boosts Kolhapur's development.
Web Summary : कोल्हापुर का बहुप्रतीक्षित आईटी पार्क स्वीकृत! 'लोकमत' द्वारा परियोजना के महत्व को उजागर करने के बाद, सरकार ने शेंडा पार्क में भूमि आवंटन को मंजूरी दी। इस निर्णय से रोजगार सृजन और कोल्हापुर का विकास होगा।