व्यापाऱ्याची भरदिवसा घरातून लॅपटॉपसह बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:00 IST2018-07-30T11:58:42+5:302018-07-30T12:00:34+5:30
शाहूपुरी पाच बंगला येथील घराचे उघड्या दरवाजातून चोरट्याने प्रवेश करून लॅपटॉप व मोबाईल असलेली बॅग हातोहात लंपास केली. रविवारी सकाळी साडेआठ ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने शाहूपुरी पोलीस चक्रावून गेले आहेत.

व्यापाऱ्याची भरदिवसा घरातून लॅपटॉपसह बॅग लंपास
कोल्हापूर : शाहूपुरी पाच बंगला येथील घराचे उघड्या दरवाजातून चोरट्याने प्रवेश करून लॅपटॉप व मोबाईल असलेली बॅग हातोहात लंपास केली. रविवारी सकाळी साडेआठ ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने शाहूपुरी पोलीस चक्रावून गेले आहेत.
अधिक माहिती अशी, सौरभ दीपक शहा (वय ३०) यांचे शाहूपुरी पाच बंगला परिसरात रत्नदिप हौसिंग सोसायटी येथे घर आहे. त्यांची प्रिंटिंग प्रेस आहे. रविवारी सकाळी एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ते अंत्यविधीसाठी गेले होते. घरी आई, त्यांची पत्नी, भावजय होत्या. त्या सर्वजण स्वयंपाक घरात चहा पिण्यामध्ये मग्न असताना सौरभ शहा यांची लॅपटॉप, दोन मोबाईल असलेली बॅग हॉलमधील शोकेसच्या टेबलवर ठेवली होती.
घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. सकाळी अकराच्या सुमारास सौरभ घरी आले असता त्यांना बॅग गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी घरातील लोकांकडे चौकशी केली; परंतु बॅग कोणी नेली हे घरातील लोकांना माहिती नव्हते. दरवाजा उघडा असल्याने चोरट्याने बॅग लंपास केल्याची खात्री होताच त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.