शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 19:04 IST2021-07-30T19:01:41+5:302021-07-30T19:04:49+5:30
Kolhapur Flood : महापुराच्या स्थितीत कोल्हापूर शहराशी संपर्क कायम राहण्यासाठी शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल राज्य शासनाकडून बांधण्यात यावा. कुंभी-कासारी नदीचे पाणी हे कुशिरे, पोहाळेकडे नेण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी आंबेवाडी, वडणगे, प्रयाग चिखलीतील पूरग्रस्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यावर योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

कोल्हापुरात शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपूल येथून पंचगंगा नदीजवळील पूरबाधित परिसराची पाहणी करून पूरबाधित आंबेवाडी, प्रयाग चिखली, वडणगे येथील ग्रामस्थांसमवेत संवाद साधला. यावेळी शेजारी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : महापुराच्या स्थितीत कोल्हापूर शहराशी संपर्क कायम राहण्यासाठी शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल राज्य शासनाकडून बांधण्यात यावा. कुंभी-कासारी नदीचे पाणी हे कुशिरे, पोहाळेकडे नेण्याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी आंबेवाडी, वडणगे, प्रयाग चिखलीतील पूरग्रस्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यावर योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुपारी साडेबाराच्यासुमारास शिवाजीपूल येथून पूरबाधित परिसराची पाहणी केली. ह्यएनडीआरएफह्ण पथकाचे काम, पूरबाधित परिसराची पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिली. यावर्षीच्या मुसळधार पावसाने पूररेषा ओलांडली. महापुराचा आंबेवाडी, प्रयाग चिखली, वडणगे या गावांना फटका बसला.
महापुराची स्थिती उदभवल्यास कोल्हापूर शहराशी असलेला संपर्क कायम राहणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवाजीपूल ते केर्लीपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात यावा अथवा रेडेडोह, केर्ली आदी तीन ते चार ठिकाणी कमानीसारखे उड्डाणपूल शासनाने बांधावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असल्याचे ह्यगोकुळह्णचे संचालक अजित नरके यांनी सांगितले. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी, तज्ज्ञांसमवेत चर्चा करून योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, माजी आमदार राजेश क्षीरसागर, गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, जिल्हा परिषद सदस्य कोमल मिसाळ, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, पुनर्वसनासाठी रजपूतवाडी येथे दिलेल्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे, अशी मागणी प्रयाग चिखलीतील ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली.