कोल्हापुरात रंगला म्हशींचा रोड शो, गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:18 IST2025-10-25T16:17:58+5:302025-10-25T16:18:49+5:30
कमालीची ईर्ष्या, रोड शो साजरा झाला, पण त्याला महापालिका निवडणुकीची झालर

कोल्हापुरात रंगला म्हशींचा रोड शो, गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरारक अनुभव
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध भागात दीपावली पाडव्यानिमित्त सजवलेल्या म्हशींचा रोड शोचे आयोजन केले जाते. यंदाही रोड शो साजरा झाला, पण त्याला महापालिका निवडणुकीची झालर होती. यामध्ये कमालीची ईर्ष्या पहावयास मिळाली, चक्क म्हशींच्या पाठीवर नेत्यांसह इच्छुकांचे समर्थक म्हणून लिहिले होते. यामाहा गाडीवरून म्हैस पळवण्याचा थरार अनुभवला.
बळीराजाला आणि गवळी समाजबांधव तसेच म्हैसधारकांना साथ देणाऱ्या म्हैशी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच जनावर म्हणजे फक्त उपयोगी प्राणी नाही, त्या सामाजिक जीवनाचा भाग आहेत, म्हणून त्यांना साज-शृंगार दिला जातो. दरवर्षी दीपावली पाडव्यानिमित्त म्हशींना सुशोभित करून सजवलेल्या म्हशींचा रोड-शो आयोजित करण्यात येतो. आमदार सतेज पाटील प्रेमी मित्रमंडळ, सागरमाळ येथे रेड्यांचा आणि म्हशींच्या रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सर्जेराव साळोखे, काकासाहेब पाटील, संदीप पाटील, उमेश पवार, सुरेश ढोणुक्षे, स्वप्नील रजपूत, समीर कुलकर्णी, माजी नगरसेवक भुपाल शेटे, विजय सूर्यवंशी, अमित कदम, अनिरुद्ध भुर्के, शशिकांत पवार, मयूर पाटील यांच्यासह रेड्यांची टक्कर आणि सागरमाळ परिसरातील शर्यत शौकीन उपस्थित होते.
यामाहाचा ठोका अन् म्हशींची घालमेल
शर्यतीच्या म्हशींच्या कानात यामाहाच्या सायलरसन्सचा आवाज बसलेला असतो. गाडीचा आवाज ऐकून गाडीसोबत वाऱ्याच्या वेगाने त्या पळतात. या राेड शो मध्येही यामाहाचा ठोका ऐकल्यानंतर म्हशींची घालमेल पहावयास मिळत होती.