दोन्ही काँग्रेस, भाजपमध्ये रस्सीखेच
By Admin | Updated: October 9, 2014 23:06 IST2014-10-09T21:38:16+5:302014-10-09T23:06:57+5:30
राजकीय वातावरण तप्त : शाब्दिक चकमकी; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

दोन्ही काँग्रेस, भाजपमध्ये रस्सीखेच
राजाराम पाटील - इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आयोजित पदयात्रा व कोपरसभांतून होणाऱ्या शाब्दिक चकमकी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या झडणाऱ्या फैरीमुळे राजकीय वातावरण तप्त झाले आहे. पक्ष आणि आघाडीपेक्षा गटातटांच्या राजकारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारांशी थेट संपर्कावर भर दिला जात असून राष्ट्रीय, राष्ट्रवादी या दोन्ही कॉँग्रेससह भाजप अशी तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.
इचलकरंजी हे हातकणंगले तालुक्यातील मोठे औद्योगिक शहर असल्याने त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. मतदारसंघावर कॉँग्रेसचे वर्चस्व असले तरी गेल्या साठ वर्षांत कॉँग्रेसला चारवेळा मोठा धक्का मिळाला आहे. अलीकडील पंचवीस-तीस वर्षांत येथील कॉँग्रेस पक्षात कल्लाप्पाण्णा आवाडे एक वेळ मंत्री आणि दोनवेळा खासदार झाले. त्यांचे पुत्रसुद्धा पाच वेळा आमदार आणि तीनवेळा मंत्री झाल्याने आवाडे पिता-पुत्रांचा दबदबा येथे राहिला. मात्र, त्यामुळे इचलकरंजीच्या राजकारणात कॉँग्रेस (आवाडे) विरुद्ध बाकी सर्वजण असेसुद्धा चित्र निर्माण झाले.
राज्य पातळीवर भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रीय व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील आघाडी तुटली आणि भाजप व कॉँग्रेस वगळता अन्य पक्षांच्या स्थानिक नेत्यांची धावपळ उडाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पडली, तर शहर विकास आघाडीची छकले झाली. कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील काही गट एकत्र येऊन ‘शविआ’ची निर्मिती झाली होती. त्यापैकी शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील गटांमध्येही तट पडले. शिवसेनेचा एक गट भाजपच्या उमेदवाराबरोबर राहिला, तर दुसऱ्या गटाने स्वकीय शिवसेनेचा उमेदवार स्वीकारला. कॉँग्रेसमधील आवळे गट राष्ट्रीय कॉँग्रेसबरोबर आणि राष्ट्रवादीतील काही नगरसेवक स्वकीय उमेदवाराकडे, तर काही भाजपकडे असे चित्र निर्माण झाले.
भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या जाहीर सभा झाल्या. सभांमध्ये स्थानिक नेत्यांनी आवाडेंवर जोरदार टीकाटिप्पणी केली असली तरी मंत्र्यांनी मात्र इचलकरंजी स्पेशल टेक्स्टाईल झोन करण्याची ग्वाही दिली. इकडे आवाडेंच्या पदयात्रा व प्रचार सभांमध्ये कॉँग्रेसने केलेल्या विकासकामांचा आढावा, वस्त्रोद्योगाची उन्नती, याबरोबरच हाळवणकरांवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या मदन कारंडे यांच्याही पदयात्रा व कोपरा सभा सुरू आहेत. त्यातून राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला जात आहे. अशाच प्रकारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदाशिव मलाबादे, शिवसेनेचे मुरलीधर जाधव व मनसेचे मोहन मालवणकर यांच्या पदयात्रा होत आहेत, तर कामगार नेते मिश्रीलाल जाजू हे कामगारांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय कॉँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मात्र, कॉँग्रेस आणि भाजपमध्ये परस्परांवर करण्यात येणाऱ्या टीकाटिप्पणीमुळे वातावरण तापलेले आहे. युती व आघाडी तुटल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या निवडणुकीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून
राहिले आहे.
इचलकरंजी
एकूण मतदार २,६८,९९१
प्रचारातील मुद्दे
हाळवणकर यांचे वीज चोरी प्रकरण आणि त्यासंदर्भात झालेल्या कोर्टबाजीबाबतची
उलटसुलट चर्चा.
आवाडे घराणे, संस्थांचे राजकारण, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी.
वस्त्रोद्योगाच्या उन्नती-विकासासाठी राबविलेल्या योजना व उपक्रम कॉँग्रेसचा मुद्दा, तर इचलकरंजी टेक्स्टाईल हब करण्याची भाजपची ग्वाही.
युती आणि आघाडी तुटल्याने गटा-तटाच्या ध्रुवीकरणात स्थानिक नेत्यांची झालेली दमछाक.