Kolhapur: दहावी परीक्षेत कमी गुण मिळाले, बोरवडेतील विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले; गळफास घेत जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:50 IST2025-05-15T17:49:24+5:302025-05-15T17:50:17+5:30
मुरगुड : मंगळवारी लागलेल्या दहावीच्या निकालात ६२.८० टक्के गुण मिळून ही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने निराश होऊन कागल तालुक्यातील ...

Kolhapur: दहावी परीक्षेत कमी गुण मिळाले, बोरवडेतील विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले; गळफास घेत जीवन संपवले
मुरगुड : मंगळवारी लागलेल्या दहावीच्या निकालात ६२.८० टक्के गुण मिळून ही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने निराश होऊन कागल तालुक्यातील बोरवडे येथील ऋषिकेश नितीन साठे (वय १६) या विद्यार्थ्याने घरीच तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. निकालाचा आनंदोत्सव सुरू असताना, ही दुदैवी घटना उघडकीस आल्याने बिद्री पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद मुरगुड पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.
कागल तालुक्यातील बोरवडे येथील ऋषिकेश साठे याने दुपारी ऑनलाइन निकाल पाहिला. त्याला ६२.८० टक्के गुण मिळाले होते. त्याने सायंकाळी सहाच्या सुमारास घरातील माळ्यावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी तत्काळ त्याला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
ऋषिकेश अत्यंत मनमिळावू आणि होतकरू विद्यार्थी होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा आहे त्याच्या अचानक जाण्याने बोरवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो गावातीलच बोरवडे विद्यालय, बोरवडे येथे दहावीत शिकत होता. त्याच्या आत्महत्येमुळे त्याचे आई-वडील आणि नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत बाजीराव शिवाजी साठे याने याबाबत मुरगूड पोलिसात फिर्याद दिली.