कोल्हापूर जिल्ह्यात रक्त झाले स्वस्त : ‘व्होल ब्लड’, ‘पीसीव्ही’च्या दरात ३५ टक्के सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 11:01 IST2020-04-16T10:59:28+5:302020-04-16T11:01:14+5:30
सध्या हॉस्पिटल म्हटले की काळजात धस्स होते. एखाद्याला तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली, प्रसूतीच्यावेळी रक्ताची गरज भासली तर कोल्हापू

कोल्हापूर जिल्ह्यात रक्त झाले स्वस्त : ‘व्होल ब्लड’, ‘पीसीव्ही’च्या दरात ३५ टक्के सवलत
कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर एक सामाजिक बांधीलकी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांनी पुढील चार महिन्यांसाठी ‘व्होल ब्लड’, ‘पीसीव्ही’ रक्ताच्या दरात सरासरी ३५ टक्के इतकी कपात केली आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारी देशातील पहिली असोसिएशन आहे.
‘कोरोना’च्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सारी ताकद लावली आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक नाड्या थंडावल्या आहेत. अशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची पैशाअभावी आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र आपणास पहावयास मिळत आहे. ‘कोरोना’ ही राष्टÑीय आपत्ती असून अशा संकटावेळी समाजातील प्रत्येक घटक माणुसकीच्या नात्यातून एकमेकांना मदत करीत आहे. सध्या हॉस्पिटल म्हटले की काळजात धस्स होते.
एखाद्याला तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली, प्रसूतीच्यावेळी रक्ताची गरज भासली तर कोल्हापूर जिल्हा रक्तपेढी असोसिएशनने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.आगामी चार महिन्यांसाठी रक्ताच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता लोकांना ‘व्होल ब्लड’ व ‘पीसीव्ही’(तांबड्या पेशी)ची गरज भासते. त्यामुळे सध्या या दोनच प्रकारच्या रक्ताच्या दरात सवलत दिली आहे. सध्याच्या दरापेक्षा सरासरी ३५ टक्क्यांनी दर कमी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांनी एकत्रित येत हा निर्णय घेतला असून, असा निर्णय घेणारी कोल्हापूर रक्तपेढी असोसिएशन ही देशातील एकमेव आहे.
-
रुग्णांनी सवलतीचे दरच द्यावेत
रक्तपेढ्यांनी सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध केले असले तरी हॉस्पिटलनी रुग्णांकडून हेच दर घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी हॉस्पिटलच्या दर्शनी भागात हे दरपत्रक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सक्ती केली पाहिजे.
असे राहणार दर-
रक्तघटक सध्याचे दर सवलतीचे दर
होल ब्लड (संपूर्ण रक्त) १४५० रुपये ९५० रुपये
पीसीव्ही (तांबड्या पेशी) १४५० रुपये ९५० रुपये
रक्तपेढी असोसिएशन नेहमीच सामाजिक बांधीलकी जोपासत काम करते. तुटवड्याच्या काळात लोकांना रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर दोनच दिवसांत सर्व रक्तपेढ्या फुल्ल झाल्या, ही दानत कोल्हापूरकरांची आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदत करणे, हे आमचे कर्तव्य आहे.
- प्रकाश घुंगूरकर (अध्यक्ष, कोल्हापूर रक्तपेढी असोसिएशन)