BJP's move to maintain power, Chandrakant Patil convened by state president | सत्ता राखण्यासाठी भाजपच्या हालचाली,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक
सत्ता राखण्यासाठी भाजपच्या हालचाली,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक

ठळक मुद्देसत्ता राखण्यासाठी भाजपच्या हालचालीप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख नेत्यांची यासाठी बैठक बोलावली आहे. यामध्ये प्राथमिक रणनीती ठरविण्यात येईल.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. आमदार हसन मुश्रीफ , आमदार सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील या तिघांनीही जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्याचा चंग बांधला आहे; यासाठी बहुतांशी सदस्यांची एक बैठकही त्यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेत घेतली.
या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आज, शनिवारी ही बैठक बोलावली आहे.

आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक यांना या बैठकीसाठी निरोप देण्यात आले आहेत. भाजपने जनसुराज्य, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ताराराणी आघाडी, युवक क्रांती आघाडी, ताराराणी विकास आघाडी, अपक्ष अशी गोळाबेरीज करून पावणेतीन वर्षांपूर्वी भाजपच्या शौमिका महाडिक यांना अध्यक्षपदी बसविले; मात्र आता राज्यातील सत्ता हातातून गेल्याने आणि जिल्ह्यातील बळ कमालीचे घटल्याने भाजप सध्या बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सतेज पाटील, पी. एन. पाटील आणि हसन मुश्रीफ या तिघांपैकी किमान दोघांचे मंत्रिपद निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखणे सोपी गोष्ट नाही; परंतु तेच नियोजन घालण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

स्थानिक समीकरणे वेगळी

महाआघाडी म्हणून राज्य पातळीवर शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या असतील, तरी त्याची तंतोतंत अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत नसते. यावर भाजपची भिस्त असून, गेल्यावेळचे मित्रपक्ष आता नेमकी काय भूमिका घेणार, यावर जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित अवलंबून आहे.
 

 

Web Title: BJP's move to maintain power, Chandrakant Patil convened by state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.