ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ९५० उमेदवार विजयी; समरजित घाटगे यांचा दावा : कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:47+5:302021-01-20T04:24:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता नसतानाही जिल्ह्यात भाजपला लक्षणीय यश मिळाल्याचा आणि १७६० पैकी ९५० हून ...

BJP wins 950 Gram Panchayat elections; Samarjit Ghatge's claim: Success to the hard work of the workers | ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ९५० उमेदवार विजयी; समरजित घाटगे यांचा दावा : कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला यश

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ९५० उमेदवार विजयी; समरजित घाटगे यांचा दावा : कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला यश

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता नसतानाही जिल्ह्यात भाजपला लक्षणीय यश मिळाल्याचा आणि १७६० पैकी ९५० हून अधिक उमेदवार विजयी झाल्याचा दावा ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी मंगळवारी येथे निवेदनाद्वारे केला. जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांचे कष्ट व परिश्रमाचे हे फळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

घाटगे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे; परंतु ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक आघाडीशी जुळवून घेत पार पडली. तरीही राज्यात ३२६३ जागा जिंकून भाजप प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात ३८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने १७६० जागी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ९५० हून आधिक उमेदवार विजयी झाले आहेत. म्हणजे ही यशाची टक्केवारी ६० टक्के आहे.

भाजप विरोधी बाकावर असतानाही मतदारांनी दिलेला कौल चांगला आहे. या निवडणुकीचा कौल पाहता महाविकास आघाडी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यातील आलेले अपयश, प्रामाणिक शेतकऱ्यांना न दिलेले प्रोत्साहनपर अनुदान, अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली तोकडी मदत, न दिलेली वीज बिल माफी याबाबत जनतेत सरकारविषयी नाराजी असल्याचे दिसते. भाजपच्या यशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांचे सहकार्य लाभले.

शंभरहून अधिक बिनविरोध

जिल्ह्यात भाजपचे शंभरपेक्षा जास्त ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत .याचा अर्थ भाजपला चांगला जनाधार आहे .जिल्ह्यात तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्र येऊनही त्यांना ८० ठिकाणी बहुमत मिळाल्याचे घाटगे यांनी म्हटले आहे.

Web Title: BJP wins 950 Gram Panchayat elections; Samarjit Ghatge's claim: Success to the hard work of the workers