भाजपला सक्षमपणे स्वत:च्या पायावर उभं करायचंय
By Admin | Updated: May 22, 2015 00:40 IST2015-05-22T00:33:48+5:302015-05-22T00:40:23+5:30
चंद्रकांतदादा पाटील : जनतेने भरभरून दिले आता आश्वासनांची पूर्तता; भाजप अधिवेशनानिमित्त ‘लोकमत’ला विशेष मुलाखत

भाजपला सक्षमपणे स्वत:च्या पायावर उभं करायचंय
‘लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पक्षाला भरभरून मते देऊन सत्तेपर्यंत पोहोचविले. आता आम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे आणि एक चांगले, कार्यक्षम नेतृत्व देणे हे आमचे कर्तव्य आहे. जनतेची कामे करताना पुढच्या वाटचालीत आम्हाला भारतीय जनता पक्ष एक सक्षम राजकीय पक्ष म्हणून स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभा करायचाय. त्याची सुरुवातही आम्ही नव्या जोमाने केलीय,’ भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ‘लोकमत’ला मुलाखत देताना बोलत होते. त्यांच्या बोलण्यात जोश होता, उत्साह होता आणि काहीतरी चांगले करण्याची जिद्द होती.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शुक्रवार, शनिवार व रविवार अशी तीन दिवस कोल्हापुरात होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली. यावेळी सहकारी संस्थांच्या माध्यमातून भक्कम सत्ता निर्माण केलेल्या प्रस्थापित पक्षांना व त्यांच्या नेत्यांना ठोकर मारून जनतेने आमच्यावर विश्वास दाखविला. आता सरकार म्हणून जनतेला न्याय देण्याचे आमचे उत्तरदायित्व आहे. जे जे जनतेच्या हिताचे आहे, ते ते करण्यावर आमचा जोर राहील. यात आम्ही बिलकूल कमी पडणार नाही, असे पाटील म्हणाले.
प्रश्न : भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक कोल्हापुरातच का घेतली जातेय?
उत्तर : तसा काही विशिष्ट हेतू नाही. कुठेतरी घ्यायची होती. कोल्हापुरात घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक कोल्हापूरला न घेता औरंगाबादला घेण्याचा विचार पुढे आला होता; परंतु आम्हीच आग्रही होतो. सहा वर्षांपूर्वीही अशी बैठक येथे झाली होती. तिचा अनुभव पाठीशी होताच. त्यामुळे कोल्हापूर हे ठिकाण निश्चित करण्यात आले.
प्रश्न : पश्चिम महाराष्ट्रात सध्या पक्षाची स्थिती कशी आहे?
उत्तर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगली मते पडली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे २५ आमदार निवडून आले. शिवसेनेचे नऊ आमदार धरले, तर निम्म्यांहून अधिक आमदार युतीचे आहेत. आमच्यावर जनतेचा विश्वास वाढतोय. त्यामुळे पक्षाची ताकद निर्माण होतेय, हे निश्चित.
प्रश्न : संस्थात्मक पातळीवर भाजप कुठे मजबूत आहे ?
उत्तर : बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडे शैक्षणिक तसेच सहकारी संस्था नाहीत, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे संस्थात्मक कार्यात खरंच आम्ही कमी आहोत. त्यामुळे तडजोडीचे राजकारण करीत अशा संस्थांत प्रवेश करतो आहोत. नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅँकांच्या निवडणुकीत तडजोडी व सहमतीचे राजकारण करीत कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. सांगली व नगर जिल्हा बॅँकेत सत्ता मिळविली. कोल्हापूरमध्ये चंचुप्रवेश झाला आहे. पुणे व सोलापूरमध्ये आम्हाला चांगली मते मिळाली. तेथेही भविष्यात आम्हाला यश मिळेल, अशी आशा आहे. सांगली अर्बन बॅँक दहा वर्षांनंतर ताब्यात घेतली. ‘गोकुळ’मध्ये आम्ही तज्ज्ञ संचालक म्हणून बाबा देसाई यांना पाठवतो आहोत. सहकारी संस्थांमध्ये अशा पद्धतीने शिरकाव करतोय.
प्रश्न : कृ षी बाजार समित्यांच्या निवडणुका लढणार का?
उत्तर : राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका भाजपतर्फे लढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेथे आमची ताकद आहे तेथे आम्ही स्वत: लढू. जेथे आवश्यकता आहे, तेथे शिवसेनेची मदत घेऊ.
प्रश्न : सहकारात नवीन संस्था सुरू करणार का?
उत्तर : नवीन संस्था काढणे म्हणजे सहकाराचे वाटोळे केल्यासारखे होईल, याची जाणीव आहे. म्हणूनच मेरिटच्या विरोधात आम्हाला जायचे नाही. त्यामुळे ज्या संस्था अडचणीत आहेत, त्यांचे अस्तित्व फक्त कागदावर आहे, अशा संस्था चालवायला घेऊन त्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. अशा संस्थांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच सातारचे अतुल भोसले, सांगलीचे पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप ही मंडळी आमच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या ताब्यातील संस्थाही आता भाजपच्या अधिपत्याखाली काम करतील. त्यांना मदत केली जाईल. ही सर्व मंडळी भाजपच्या संस्कृतीत रुजत आहेत.
प्रश्न : आणखी कोणी भाजपमध्ये येणार आहेत काय?
उत्तर : भाजपमध्ये येण्यासाठी अनेक मान्यवर नेते इच्छुक आहेत. त्यांची मोठी यादीच आहे. येत्या महिन्याभरात पक्षप्रवेशाचा धडाका लावू. येत्या आठवडाभरात कोल्हापुरातील एक मान्यवर नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या ताब्यात अनेक संस्था आहेत. पक्षाचा झेंडा ते खांद्यावर घेतील.
प्रश्न : कार्यकर्त्यांचे केडर कसे तयार करणार?
उत्तर : सत्तेत आल्यापासून आम्ही भाजपची सदस्य संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात सगळीकडेच ही मोहीम राबवीत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद आहे. कोल्हापूरचे उदाहरण द्यायचे झाले तर जेथे पाच-सहा हजार सभासद करताना आम्हाला अडचणी यायच्या, तेथे आज शहरात ७८ हजार, तर ग्रामीण भागात २२ हजार सभासदांची नोंद झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्र हीच शाखा मानून क्रियाशील कार्यकर्त्यांचे केडर तयार करतोय. आता आमचे प्रत्येक केंद्रावर दहा कार्यकर्ते तयार आहेत. बोगस मतदान रोखणे, मतदानासाठी मतदारांना बाहेर काढणे ही कामे ते करू शकतील.
प्रश्न : स्थानिक संस्थांच्या बाबतीत धोरण काय आहे?
उत्तर : लोकसभा, विधानसभा निवडणुका लढलो, जिंकलो. आता आमचे उद्दिष्ट महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आहेत. जेथे निवडणुका लागतील, तेथे पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील हे नक्की; कारण आम्हाला पक्षाचा विस्तार वाढवायचा आहे. पक्ष मजबूत करायचा आहे. कार्यकर्त्यांना ताकद द्यायची आहे आणि या संस्थांवर नेतृत्व करायचे आहे. ज्यावेळी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांत बहुमताने पोहोचू, त्याचवेळी पक्ष अधिक मजबूत होईल, असे आम्हाला वाटते.