काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 13:42 IST2022-01-13T13:37:27+5:302022-01-13T13:42:32+5:30
संजय मंडलिक यापुढच्या काळात काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतच, अशी गुगलीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाकली.

काही नेत्यांची फसवण्याची परंपरा, या जन्मातच सगळं फेडायचं; चंद्रकांत पाटलांचा इशारा
कोल्हापूर : काही नेत्यांची फसवण्याची परंपरा आहे. पक्ष, संघटनेलाही काही जण फसवत आले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीत नेत्यांनी फसवणूक केली हे उघड आहे. परंतु काळ बदलला आहे. या जन्मातच सगळे फेडायचे आहे. असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ आघाडीसोबत जाऊनही प्रकाश आवाडे यांचा पराभव झाला. आजऱ्यामध्ये भाजपचेच अशोक चराटी हरले. भाजपच्या आणि जवळीक असणाऱ्यांना जाणीवपूर्वक पाडले आहे का? अशी विचारणा केली पाटील यांनी आघाडीतील नेत्यांना हा इशारा दिला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे भाजपच्या विचारांशी जवळीक असलेले होते. परंतु कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेला मिळाल्याने ते कॉंग्रेसमध्ये गेले. त्यांच्या पत्नी जयश्रीताई आणि बंधू संभाजी हे भाजपचेच नगरसेवक होते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत जयश्रीताई यांची वेळ घेऊन त्यांना भेटून भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची विनंती करणार आहे, अशी माहिती ही पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी पाटील म्हणाले, आम्ही विनंती केल्यानंतरही जर त्यांनी भाजपच्यावतीने निवडणूक लढण्यास नकार दिला तर, मग आमची जी राज्यस्तरीय १३ जणांची कोअर कमिटी आहे ही याबाबतचा निर्णय घेईल.
मंडलिक काय करणार असतील तर आमचे तिघे आहेत
जिल्हा बॅंकेत विनय कोरे, अमल महाडिक, विजय माने असे तिघे जण आहेत. त्यामुळे संजय मंडलिक यापुढच्या काळात काय करणार असतील तर आमचे तिघे आहेतच, अशी गुगलीही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी टाकली.