पक्षी निरीक्षणात रंकाळ्यावर आढळले २३ प्रजातींचे पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:17+5:302021-01-08T05:16:17+5:30
रहिवासी, स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश : चिल्लर पार्टीच्या सदस्यांचे पक्षी निरीक्षण कोल्हापूर : रंकाळा तलावावर विविध स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांची ...

पक्षी निरीक्षणात रंकाळ्यावर आढळले २३ प्रजातींचे पक्षी
रहिवासी, स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश :
चिल्लर पार्टीच्या सदस्यांचे पक्षी निरीक्षण
कोल्हापूर : रंकाळा तलावावर विविध स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांची रेलचेल आहे. विशेषत: पाणपक्षी, विविध जातींचे बगळे, वंचक, ग्रे हेरॉनसारखे कधीही पाहायला न मिळणारे २३ प्रजातींचे पक्षी पाहण्याचा आनंद चिल्लर पार्टीच्या ज्युनियर सदस्यांनी रविवारी घेतला.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या ज्युनियर सदस्यांसाठी हे पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात आले होते. कळंबा तलावावरील पक्षी निरीक्षणानंतर रंकाळा तलावावरील या पक्षी निरीक्षणात विविध प्रजातींचे पक्षी मुलांना पाहायला मिळाले.
चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांनी या पक्ष्यांची प्रत्यक्ष ओळख करून दिली. पक्षी कसे ओळखावेत, त्यांच्या सवयी कशा असतात, त्यांचे खाद्य काय, रहिवासी पक्षी कोणते, स्थलांतरित पक्षी कोणते, अशा प्रकारची सूक्ष्म माहिती यादव यांनी या मुलांना करून दिली. सकाळी ७ वाजता संध्यामठ परिसरातून हे पक्षी निरीक्षण सुरू करण्यात आले. रंकाळ्याच्या काठा-काठाने फिरून दोन तासानंतर क्रशर चौकात या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
मुलांनी आपल्याकडील दुर्बिणीतून हे विविध प्रजातींचे पक्षी पाहिले. याशिवाय मोबाईलवरून तसेच कॅमेऱ्यातून या पक्ष्यांची छायाचित्रेही काढली.
या पक्षी निरीक्षणात चिल्लर पार्टीचे आर्षद आणि ईशान महालकरी, श्रीनाथ काजवे, मनस्वी आणि यशोवर्धन आडनाईक, चंद्रकांत तुदिगाल, घन:श्याम लाड, ओंकार कांबळे, अनुजा बकरे आदी ज्युनियर सदस्य सहभागी झाले होते. या उपक्रमाचे आयोजन शिवप्रभा लाड, मिलिंद कोपार्डेकर, सलीम महालकरी यांनी केले.
रंकाळ्यावर आढळले हे पक्षी...
नाम्या, जांभळी पाणकोंबडी, जकाना किंवा कमळपक्षी, स्मॉल ब्ल्यू किंगफिशर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, कवड्या धीवर, टिबुकली, लहान बगळा, वंचक, राखी बगळा, पाणकावळा, तुतारी, पिवळा धोबी, स्पॉट बिल्ड डक, सुरई (रिव्हरटर्न), शेकाट्या, तारवाली, टिटवी, वेडा राघू, रेड व्हेन्टेड बुलबुल, ब्राम्हणी घार, ब्लॅक हेडेड आयबीस.
--------------------------
फोटो : 0५0१२0२१-कोल-बर्ड वॉचिंग 0१
फोटो ओळी : कोल्हापुरात ''''''''चिल्लर पार्टी''''''''तर्फे आयोजित केलेल्या रंकाळा तलावावरील पक्षी निरीक्षण उपक्रमात ज्युनियर सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.