‘बिद्री’च राज्यात भारी
By Admin | Updated: July 6, 2014 00:20 IST2014-07-06T00:18:17+5:302014-07-06T00:20:32+5:30
सर्वाधिक २६00 रुपये ऊस दर : १00 रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर

‘बिद्री’च राज्यात भारी
सरवडे : २0१३-१४ साठी गळितास आलेल्या उसाला बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याने उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन १00 रुपये जाहीर केला आहे, तर दिवाळीपूर्वी आणखी १00 रुपयांचा तिसरा हप्ता देण्याची घोषणा आज, शनिवारी करण्यात आली. याअगोदर कारखान्याने एकरकमी २५00 रुपये प्रतिटन अदा केले आहेत. त्यामुळे ‘बिद्री’ कारखान्याने दिलेला दर हा राज्यात सर्वाधिक दर असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना कारखान्याचे अध्यक्ष, आमदार के. पी. पाटील म्हणाले, या हंगामात ५ लाख ८७ हजार मे. टन ऊस गळितास कारखान्याकडे आला होता, तर ७ लाख ८४ हजार हजार क्विंटल साखर उत्पादन झाले. सरासरी साखर उतारा १३.३३ इतका मिळाला आहे. या उसाला पहिला हप्ता २५00 रुपये विनाकपात दिला आहे. ऊस उत्पादकांच्या खात्यावर लवकरच प्रतिटन १00 रुपये जमा करण्यात येणार आहेत. ही एकूण रक्कम २६00 रुपये होत असून, ती राज्यात सर्वाधिक असल्याचे सांगून दिवाळीपूर्वी आणखी १00 रुपयांचा तिसरा हप्ता देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय खराडे, संचालक के. जी. नांदेकर, नामदेवराव भोईटे, ए. वाय. पाटील, प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, विजयसिंह मोरे, वसंतराव पाटील, पंडितराव केणे, राजेखान जमादार, धनाजीराव देसाई, जीवन पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)