आजऱ्यात ऊस तोडण्यासाठी २५०० रुपयांची मागितली जाते बिदागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:45+5:302020-12-24T04:21:45+5:30
* तालुक्यातील ८७ टक्के ऊस अद्याप शेतातच सदाशिव मोरे। आजरा आजरा साखर कारखान्याचे धुराडे सलग दुसऱ्या वर्षीही बंद राहणार ...

आजऱ्यात ऊस तोडण्यासाठी २५०० रुपयांची मागितली जाते बिदागी
* तालुक्यातील ८७ टक्के ऊस अद्याप शेतातच
सदाशिव मोरे। आजरा
आजरा साखर कारखान्याचे धुराडे सलग दुसऱ्या वर्षीही बंद राहणार आहे. ऊस गाळपासाठी शेजारील कारखाने सुरू होऊन पावणेदोन महिले झाले. परंतु, तालुक्यातील ८० टक्के ऊस अद्यापही शेतातच आहे. तसेच ऊसतोड टोळ्यांकडून लोडला २५०० रुपयांची बिदागी घेतली जात असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे.
तालुक्यातील सर्वात जास्त क्षेत्र ऊस व भात पिकासाठी आहे. रासायनिक खताबरोबरच सेंद्रिय पद्धतीनेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. जवळपास २० ते ३० टक्के शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाकडून नवीन तंत्रज्ञान व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रबोधन केले जात आहे. कमी कष्टाचे पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते. परंतु, अतिवृष्टी व जंगली जनावरांच्या तावडीतून सुटलेले ऊस पीक गाळपासाठी कारखान्याकडे पाठविले जाते. गेली ९ ते १० वर्षे टस्कर हत्तींचा कळप ऊस पिकावर डल्ला मारत आहे.
आजरा कारखाना आर्थिक संकटात असल्याने गेली दोन वर्षे बंद आहे. कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. सध्या तांबाळे, हेमरस, दौलत, संताजी घोरपडे, बेडकीहाळ, शाहू कारखान्यांच्या टोळ्या ऊसतोड करीत आहेत. एप्रिल, मे महिन्यात पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने डिसेंबर, जानेवारीत ऊस पाठविण्याची शेतकऱ्यांची धडपड असते. पण, चालूवर्षी एका लोडला टोळीच्या मुकादमाला २५०० रुपये मोजावे लागत आहेत.
त्यातच तांबाळे वगळता अन्य कारखान्यांच्या टोळ्या ८ ते १० अशा आहेत. कारखाना चालू होईना व ऊस दुसरा कारखाना घेऊन जाईना, अशी विचित्र अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.
-------------------------
* आजरा तालुक्यात अडीच ते पावणेतीन लाख टन ऊस उत्पादन होते. उसाला उताराही चांगला आहे. पण, सलग दोन वर्षे आजरा कारखाना बंद असल्याने उत्पादित ऊस घेऊन जाण्यास अन्य कारखाने टाळाटाळ करीत आहेत. पावणेदोन महिन्यात फक्त २० टक्के उसाची तोड झाली असून ८० टक्के ऊस शेतातच आहे.
* चालूवर्षी तालुक्यात झालेली अतिवृष्टी व जंगली जनावरांचा हैदोस यातून शिल्लक उसाचीही तोड करताना किंमत मोजावी लागत आहे. टस्कर हत्तींचा कळप गेली ९ ते १० वर्षे तालुक्यातच आहे. त्यांच्या त्रासामुळे शेतातील राखणही बंद झाली आहे. वाढलेले खतांचे दर व टोळींची मागणी यामुळे शेतकरी राजा उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.