Kolhapur News: भीमा कृषी व पशु प्रदर्शन उद्यापासून होणार खुले; १२ कोटींचा ‘बादशहा रेडा’, ‘बिजली म्हैस’ आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 18:31 IST2023-01-25T18:23:59+5:302023-01-25T18:31:30+5:30
गेली १५ वर्षे भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजन

Kolhapur News: भीमा कृषी व पशु प्रदर्शन उद्यापासून होणार खुले; १२ कोटींचा ‘बादशहा रेडा’, ‘बिजली म्हैस’ आकर्षण
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भीमा कृषी व पशु प्रदर्शन उद्या गुरुवार (दि. २६) पासून मेरी वेदर मैदानावर खुले होणार आहे. यंदा १२ कोटींचा ‘बादशहा रेडा’, ३१ लिटर दूध देणारी ‘बिजली म्हैस’ हे प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे.
खासदार महाडिक म्हणाले, शेतकऱ्यांना एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञानासह शेतीतील प्रयोगाची माहिती मिळावी, यासाठी गेली १५ वर्षे भीमा कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यामध्ये चारशे शेतीविषयक, तर दोनशे बचत गटांच्या स्टॉलचा समावेश आहे. त्याशिवाय प्रदर्शनात जातिवंत जनावरे पाहावयास मिळणार आहेत.
गुरुवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, शनिवारी (दि. २८) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कृषी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. रविवारी (दि. २९) प्रदर्शनाची सांगता होणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, डॉ. जे. पी. पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ. अशोक पिसाळ, सुहास देशपांडे आदी उपस्थित होते.
जगातील सर्वात उंच ‘बादशहा’
मागील प्रदर्शनात नऊ काेटींचा ‘सुलतान’ रेडा सर्वांचे आकर्षण ठरला होता. तो मृत झाला असून, आता जगातील सर्वात उंच असणारा ‘बादशहा’ सलग तीनवेळा चॅम्पियन ठरला आहे. त्याला दहा किलो सफरचंद, २५ लिटर दूध, काजू, पिस्ता खाण्यास दिला जातो.
‘तृणधान्यांचा स्वतंत्र स्टॉल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे ‘तृणधान्य’ वर्ष म्हणून घोषित केले असून, त्याचे औचित्य साधून प्रदर्शनात तृणधान्यांचे स्वतंत्र स्टॉल राहणार आहेत.
‘मोती संवर्धन’ करणारा शेतकरी
प्रदर्शनात भौगोलिक मानांकन प्राप्त २६ शेती उत्पादनाचा समावेश होणार असून, सडोली दुमाला (ता. करवीर) येथील एका शेतकऱ्याने ‘मोती संवर्धन’ केले आहे. त्याचा स्टाॅल खास आकर्षण राहणार आहे.