वाहतूक कोंडीबाबत प्रस्ताव : भवानी मंडप ‘कार्यालय’ मुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:54 AM2020-02-21T00:54:45+5:302020-02-21T01:13:03+5:30

कोल्हापूर : वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी भवानी मंडप येथील शासकीय कार्यालये हलविण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी गांभीर्याने चर्चा झाली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी याबाबत खास बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

Bhavani pavilion will free 'office' | वाहतूक कोंडीबाबत प्रस्ताव : भवानी मंडप ‘कार्यालय’ मुक्त करणार

पालकमंत्री सतेज पाटील यांना भेटून आपल्या मागण्या मांडण्यासाठी नागरिकांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृहावर मोठी गर्दी केली होती.

Next
ठळक मुद्दे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा‘लोकमत’मधील बैठकीचा संदर्भशासकीय विश्रामगृहावर विविध प्रश्नांवर बैठकाप्रलंबित कृषिपंप जूनपर्यंत बसविणार -- : सतेज पाटील

कोल्हापूर : जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे शाहू बॅँकेमागील ताराराणी विद्यालयामध्ये, पागा बिल्ंिडगमधील सार्वजनिक बांधकामची कार्यालये त्यांच्या इमारतीमध्ये, रजिस्ट्रार आॅफिस गांधी मैदान महापालिका इमारतीत, करवीर तहसीलदार, पोलीस ठाणेही इतरत्र हलवा, ‘मेन राजाराम’मध्ये केवळ २५० विद्यार्थी आहेत, ती शाळाही इतरत्र हलविण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सभापती संदीप कवाळे, संजय मोहिते, शारंगधर देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक कार्यकर्ते अशोक पोवार म्हणाले, भवानी मंडप ते भाऊसिंगजी रोडवरील वाहतुकीची ५० टक्के कोंडी शासकीय कार्यालयांमुळे होत आहे. ही कार्यालये हलविल्यास या ठिकाणची कोंडी कमी होणार आहे. मात्र, याबाबत तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे.

डॉ. अभिनव देशमुख यांनी यावेळी सादरीकरण केले. त्यांनी याप्रसंगी होमगार्डची कमतरता, सिग्नलची दुरुस्ती, शहरातील पार्किंगची अपुरी सुविधा, ग्रामीण भागातील रिक्षांचा शहरात प्रवेश, फेरीवाल्यांचे पुनर्वसन, दसरा चौक ते बिंदू चौक ओव्हरब्रिज अशा विविध अडचणी आणि त्याबाबतचे उपायही मांडले.

महापौर आजरेकर यांनी बंद सिग्नल बंद करण्याचा मुद्दा मांडला; तर गनी आजरेकर यांनी बिंदू चौकातील कोंडीबाबत म्हणणे मांडले. लॉरी असोसिएशनचे सुभाष जाधव, रमेश मोरे, वाहतूक पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर गृहराज्यमंत्री पाटील यांनीही महापालिकेला अनेक सूचना करून याबाबत कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सतेज पाटील म्हणाले, येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये सुट्ट्यांमुळे गर्दी होणार आहे. होमगार्डची सेवा सध्या बंद आहे. तेव्हा जे होमगार्ड आधी वाहतूक नियमनाचे काम करीत होते, त्यांना पुन्हा नेमून महापालिकेकडून त्यांना मानधन द्या. सिग्नलसाठी तुम्हांला निधी दिला आहे. सोमवारी (दि. २४) त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील सह्या व्हायला हव्यात. बंद आणि नको असलेल्या सिग्नल्सचा आढावा घ्या. ज्यांच्या खासगी रिकाम्या जागा आहेत, त्यांना त्या सशुल्क पार्किंगसाठी वापरायच्या असतील तर तसे धोरण तयार करा.

रेल्वे स्टेशनवर लिफ्ट
शाहूपुरीकडून रेल्वे स्टेशनवर येण्यासाठी ओव्हर ब्रीज आहे; परंतु नागरिकांच्या अधिक सोयीसाठी एक कोटी ८0 लाख रुपये खर्च करून दोन लिफ्ट उभारणार असल्याचे सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.

बैठका घेऊन चालत नाही
याआधीही वाहतूक कोंडीबाबत बैठका झाल्या; पण पुढे काही झाले नाही, असे विचारले असता पाटील म्हणाले, मी याआधी काय झाले यावर बोलणार नाही. चंद्रकांत पाटील यांच्यावर मी टीका करणार नाही, असे आधीच स्पष्ट केले आहे; परंतु केवळ बैठका घेऊन चालत नाही. उपाययोजनांसाठी निधीही द्यावा लागतो. याआधीच जर सिग्नलसाठी निधी दिला असता, तर तो प्रश्न मार्गी लागला असता. आता मी हा निधी दिला आहे आणि या कामांचा मी पाठपुरावाही करणार आहे.

‘महाविकास आघाडी’ तरुणाईसाठी सक्षम
कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना, आलेले अनुभव आणि ‘महापोर्टल’मधील त्रुटी लक्षात घेतल्यानंतर हे पोर्टल बंद करणे हा एकमेव उपाय होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या मनात असणारा हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. या तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पारदर्शी व सक्षम व्यवस्था महाविकास आघाडीचे हे सरकार उभारील, याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केली.


‘लोकमत’मधील बैठकीचा संदर्भ
सतेज पाटील म्हणाले, ‘लोकमत’ कार्यालयास बुधवारी (दि. १९) दिलेल्या भेटीप्रसंगी राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात येताना नागरिकांना नेमक्या कोणत्या भागात जाण्यासाठी कुठला मार्ग सोयीचा पडेल, याचे मोठे फलक लावण्यात यावेत, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार शिये फाटा, तावडे हॉटेल, उचगाव-सरनोबतवाडी, शाहू टोल नाका या ठिकाणी तसे फलक लावून तेथून शहरात किंवा बाहेर जाण्यासाठी कुठून जाणे सोयीचे होईल याबाबतच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ट्रक टर्मिनसची आज पाहणी करणार
सतेज पाटील आज, शुक्रवारी तावडे हॉटेलनजीकचे नियोजित ट्रक टर्मिनस आणि गाडीअड्ड्याला भेट देऊन तिथल्या जागेची पाहणी करणार आहेत. प्रत्येक वेळी पाटील हे महापालिकेचे अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना ‘हे काम कधी होणार?’ अशी विचारणा करीत होते. ‘जनरल बॉडीत बोलता तसे मला इथे सांगू नका,’ असेही त्यांनी सांगून टाकले. होमगार्डना महापालिकेकडून १८ लाख रुपये देण्याच्या विषयावर कलशेट्टी आढेवेढे घेत असताना ‘स्वच्छतेसाठी निधी द्या म्हटले असते तर लगेच दिला असता बघा!’ असा टोला पाटील यांनी लगावला.

प्रलंबित कृषिपंप जूनपर्यंत बसविणार -- : सतेज पाटील

कोल्हापूर : मार्च २0१८ पर्यंत जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंपांची मागणी केली होती. त्यांच्या शेतात जूनअखेर कृषिपंप बसविणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
पाटील यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृहावर विविध बैठका घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मार्च २0१८ अखेर ५४९१ जणांनी कृषिपंपांसाठी अर्ज केले होते. त्यातील ३४३८ पंप बसविण्याचे काम बाकी राहिले आहे. या कामाच्या दोन्ही ठेकेदारांना जूनपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानंतर ४७६१ शेतकऱ्यांनी कृषिपंपांसाठी अर्ज केले आहेत. त्यातील ३१३१ पंप बसविण्याचे काम शिल्लक आहे. सामाजिक न्याय व अन्य निधीतून १६३0 पंप बसविण्यात आले आहेत. यासाठी ७८ कोटी रुपयांची गरज असून, याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोललो आहे. हा निधी मिळवून डिसेंबरअखेर सर्व पंप बसविण्याचा माझा प्रयत्न आहे. दुर्गम वाड्यावस्त्यांवरील शेतक-यांचे पंप आधी बसवा, अशाही सूचना दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
गुरुवारी सकाळी ९ वा.पासून पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर ठिय्या मारला होता. तरीही रात्रीपर्यंत त्यांना भेटण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. वैयक्तिक कामे, संस्थांची कामे, रखडलेले प्रकल्प या संदर्भात आलेल्या नागरिकांनी विश्रामगृह फुलून गेले होते.

‘सीपीआर’च्या इथे काही बदल करू नका
‘सीपीआर’मध्ये वाहने लावण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा ‘तिथे कुणीही गाड्या लावून बाहेर जातात. तिथे जे चालले आहे त्यात आता बदल करू नका,’ असे पालकमंत्र्यांनी सांगून टाकले.

जिल्हा परिषदेशी बोलतो
मेन राजाराम हायस्कूलची पडून असलेली जागा पार्किंगसाठी दिली जात नाही, अशी तक्रार केल्यानंतर आपण जिल्हा परिषदेशी बोलून घेतो, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या सूचना

  • स्पीड ब्रेकरवर कायम टिकणारे रंग वापरा.
  • संभाजीनगर बसस्थानकावरून गारगोटी, राधानगरीला गाड्या सोडण्याबाबत प्रयत्न, या बसस्थानकासाठी १० कोटींच्या तरतुदीचा प्रस्ताव
  • एमआयडीसी कारखान्यांच्या वेळेत फरक ठेवा.
  • गाडीअड्डा स्वच्छ करा.
  • गॅरेजच्या जुन्या, न वापरातील रस्त्याकडेच्या गाड्या हलवा.
  • नादुरुस्त गाड्या हलवा.
  • सम-विषम पार्किंग, वन वेचे प्रस्ताव तातडीने तयार करा.

Web Title: Bhavani pavilion will free 'office'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.