चौकशीच्या आश्वासनाअंती उपोषण मागे
By Admin | Updated: December 5, 2014 23:35 IST2014-12-05T20:55:16+5:302014-12-05T23:35:29+5:30
केसरी ग्रामपंचायत : घर निर्लेखित केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

चौकशीच्या आश्वासनाअंती उपोषण मागे
सावंतवाडी : केसरी ग्रामपंचायतीने येथील राजेंद्र सावंत यांचे घर
बेकायदेशारपणे निर्लेखित करण्याचा ठराव घेतल्याच्या निषेधार्थ
राजेंद्र सावंत सावंतवाडी पंचायत समितीसमोर उपोषणास बसले होते. या प्रश्नी सखोल चौकशी करून
योग्य ती कारवाई करण्यात येईल,
असे आश्वासन उपसभापती महेश सारंग यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
केसरी येथील राजेंद्र झिलू सावंत यांचे सन १९०५ पूर्वीचे वडिलोपार्जित घर आहे. हे घर दुरुस्त करण्याबाबत कोणत्याही वारसांची तक्रार नसताना ग्रामपंचायत केसरी-फणसवडे यांनी हे घर निर्लेखित करण्याचा ठराव घेतला होता.
बेकायदेशीर पद्धतीने निर्लेखन प्रक्रिया केल्याने बुधवारी राजेंद्र सावंत, शरद मेस्त्री, हरी गावकर, सुरेखा शिरोडकर, जयेंद्र राऊळ, सत्यवान वारंग, पप्पू मोर्ये, राधाबाई नाईक, आकाश पाटील आदी उपोषणास बसले होते.
याप्रश्नी चर्चा केल्यानंतर केसरी ग्रामपंचायतीकडे चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन उपसभापती महेश सारंग यांनी दिल्यानंतर हे उपोषण सावंत यांनी स्थगित केले. यावेळी गटविकास अधिकारी शरद महाजन, कक्ष अधिकारी सुधाकर भिंगारदिवे, सुनील पेडणेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)