खासगी दवाखान्यांतील बेड ७०० पर्यंत वाढवणार : मल्लिनाथ कलशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:47 IST2020-08-13T16:45:29+5:302020-08-13T16:47:10+5:30
कोरोना रुग्णांसाठी खासगी दवाखान्यांमध्ये सध्या ५४८ बेड असून ते ७०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. ॲन्टिजेन टेस्टसाठी १० हजार किट मिळाले असून त्यांपैकी दोन हजार किट आयसोलेशनला देण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

खासगी दवाखान्यांतील बेड ७०० पर्यंत वाढवणार : मल्लिनाथ कलशेट्टी
कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी खासगी दवाखान्यांमध्ये सध्या ५४८ बेड असून ते ७०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. ॲन्टिजेन टेस्टसाठी १० हजार किट मिळाले असून त्यांपैकी दोन हजार किट आयसोलेशनला देण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शहरातील ३३ खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकारी देसाई व आयुक्त कलशेट्टी यांनी पत्रकारांना माहिती दिली.
ते म्हणाले, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी दवाखाने आता पुढे येत असून, त्यांनी बेड वाढवण्याचीही तयारी दर्शवली आहे. सध्या ५४८ बेड उपलब्ध असून त्यापैकी २२३ ऑक्सिजन बेड, ९१ नॉन ऑक्सिजन, ४१ व्हेंटिलेटर, १३४ आयसीयूचे आहेत. जिल्ह्यासाठी ॲन्टिजेन टेस्टचे पुरेसे किट उपलब्ध झाले असून सध्या सर्वाधिक चाचण्या आयसोलेशनद्वारे होत आहेत. ज्या खासगी दवाखान्यांना ॲन्टिजेन टेस्टच्या किट हवे आहेत त्यांनी लॉगीन केल्यास एका दवाखान्यास २५ किट दिले जातील.
बाहेर आलात तर कोविड केंद्रात ठेवणार
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, होम क्वारंटाईन असलेले तसेच घरातच उपचार घेत असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याचे प्रकार घडत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल. सध्या ५१८ व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये असून त्यांपैकी २८५ जणांवर महापालिका दवाखान्यांमार्फत, तर २३३ शहरातील विविध दवाखान्यांमार्फत उपचार घेत आहेत. त्यांना उपचाराचे किट प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत.