सर्किट बेंच उद्घाटनाच्या पूर्वतयारीसाठी बार असोसिएशनची दोन दिवसांत बैठक, प्रशासकीय हालचाली गतिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:48 IST2025-08-04T18:47:43+5:302025-08-04T18:48:23+5:30
कोल्हापूरकर करणार सरन्यायाधीश गवईंचा विशेष सत्कार

संग्रहित छाया
कोल्हापूर : महासैनिक दरबार हॉलमध्ये १६ ऑगस्टला होणाऱ्या सर्किट बेंच उद्घाटन समारंभाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा बार असोसिएशनची बैठक दोन दिवसांत होणार आहे. त्या बैठकीत विविध समित्यांची नियुक्ती करून कामांची जबाबदारी निश्चित होणार आहे. उद्घाटन समारंभात कोल्हापूरकरांच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विशेष आभार व्यक्त केले जाणार आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर समारंभाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.
सर्किट बेंचचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार आहे. त्या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहा जिल्ह्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. समारंभ संस्मरणीय ठरावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा बार असोसिएशनकडून प्रयत्न सुरू आहेत.
त्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनची बैठक लवकरच जिल्हा न्याय संकुलात होणार आहे. त्या बैठकीत वकिलांच्या विविध समित्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे कामांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन नियोजन केले जाईल, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी दिली.
गवईंचा विशेष सत्कार
सरन्यायाधीश गवई यांनी पुढाकार घेतल्यामुळेच कोल्हापूरसाठी सर्किट बेंच मंजूर झाले, अशी कोल्हापूरकरांची भावना आहे. याच भावनेतून त्यांचा हृद्य सत्कार करण्याची बार असोसिएशन आणि खंडपीठ कृती समितीची इच्छा आहे. त्यामुळे उद्घाटन समारंभात त्यांचा विशेष सत्कार करण्याचे नियोजन सुरू आहे. तो सत्कार संपूर्ण कोल्हापूरकरांच्या वतीने असणार आहे.
दोन ते अडीच हजारांची उपस्थिती
सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील, लोकप्रतिनिधी, विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी, पक्षकार आणि कोल्हापूरची जनता उपस्थित राहणार आहे. सुमारे दोन ते अडीच हजार जण समारंभाला उपस्थित राहतील. त्यानुसार नियोजन सुरू असल्याचे वकिलांनी सांगितले. पोलिसांकडून वाहतूक, पार्किंग, प्रवेश पास, सुरक्षेचे नियोजन केले जाणार आहे.