बाप्पांच्या स्वागतास बाजारपेठा सजल्या
By Admin | Updated: September 3, 2016 00:55 IST2016-09-03T00:43:31+5:302016-09-03T00:55:40+5:30
नारळांचीही आवक वाढली

बाप्पांच्या स्वागतास बाजारपेठा सजल्या
गणेशोत्सव : नारळ, कापूर, उदबत्ती, दूर्वा, फुले, गेदा वस्त्रासह गौरी-शंकराचे मुखवटे, सुका मेव्याची दुकाने थाटलीकोल्हापूर : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. घरगुती गणेशमूर्तीला आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. यात तयार थर्माकोल शिखरे, मखर, पूजेसाठी नारळ, कापूर, उदबत्ती, दूर्वा, फुले, गेदा वस्त्रासह गौरी-शंकराचे मुखवटे व तयार मूर्ती, शोभिवंत माळा, पाच फळे आणि प्रसादाला सुका मेवा, मिठाई, आदींच्या खरेदीसाठी बाजारात शुक्रवारी मोठी लगबग दिसत होती. यंदा डॉल्बीला मर्यादा असल्याने मंडळे पारंपरिक बॅँड व अन्य वाद्यांकडे वळू लागली आहेत.शहरातील महाद्वार रोड, पापाची तिकटी, बाजारगेट, पानलाईन, न्यू महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, टिंबर मार्केट, शिंगोशी मार्केट या सर्व बाजारपेठा गर्दीने अक्षरश: फुलल्या आहेत.
नारळांचीही आवक वाढली
गणेशोत्सव काळात तमिळनाडूहून १५० ते २०० ट्रक नारळांची आवक झाली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये ३५ हजार नारळ असतात. एकूण २०० ट्रकचा विचार करता ७० लाखांहून अधिक नारळांची आवक होते. यामध्ये प्रामुख्याने घरगुती गणेशाच्या आगमन व विसर्जनामध्ये नैवेद्यात नारळाचे मोदक, तर सार्वजनिक मंडळांमध्ये नवसासाठी नारळाची तोरणे लागतात. विशेषत: नवा, जुना, कंगणार, बोळ, या जातींचे नारळ विक्रीसाठी येतात.
गलाटा, शेवंता, अॅस्टरची मागणी वाढली
गणरायाच्या स्वागतापासून ते अगदी विसर्जनाच्या उत्तरपूजेपर्यंत हार, फुले यांना मागणी असते. विशेषत: मिरची फूल, गलाटा, शेवंती, कर्दळफूल, गुलाबाचे फूल, अॅस्टर, तुळस यांची आवकही मोठ्या प्रमाणात होते.
सणाचा उत्साह सुगंधी फुलांमुळे आणखी फुलतो. गलाटा, गौर, शेवंती, मिरची फूल, गुलाब, अॅस्टर, आदी फुलांना गणेशोत्सवाच्या काळात मोठी मागणी असते. दरही ३० ते १०० रुपये प्रतिकिलो आहे.
- शोभा कुंभार, फूल व्यापारी