कोल्हापूर : झाडांची गळालेली पाने, फुले, वेली, सालीपासून तयार केलेल्या पाच फुटी उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना येत्या शुक्रवारी येथील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळातर्फे करणार येणार आहे. मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. विसर्जनाने जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येक वर्षी याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, शंभर टक्के पर्यावरणपूरक, निसर्गनिर्मित वस्तूपासून तयार केलेली मूर्ती बसवण्याचा निर्णय मंडळाने घेतला. यानुसार मूर्तिकार संदीप कातवरे यांनी २ ऑक्टोबर २०२४ घटस्थापनेच्या मुहूर्तावर मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने झाडांची गळालेली पाने, फुले, वेलीचा लगदा तयार केला. मिश्रणाची पेस्ट तयार करण्यासाठी त्यामध्ये बाभळीच्या डिंकाचा वापर केला. मूर्तीच्या टिकाऊपणासाठी कागदी पट्टा, लाकडाचा वापर केला. मूर्ती सुबक, देखणी होण्यासाठी झाडांच्या सालींची पेस्ट करून त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून मूर्तीला अंतिम आकार दिला. रंग कामासाठी डाळिंब, पारंपरिक बळूच्या रंगाचा वापर केला. नैसर्गिक साहित्य वापरामुळे मूर्ती १०० वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकेल असा दावा त्यांनी केला. येत्या शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मिरजकर तिकटी येथून खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते मूर्तीच्या आगमनाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तेथून लक्ष्मीपुरीमधील धान्य व्यापारी बालकल्याण संस्थेच्या इमारतीमधील वरद विनायक मंदिरात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेस पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, विजय कागले, मूर्तिकार संदीप कातवरे, वैभव सावर्डेकर, राजेंद्र लकडे, वैभव लाड, सचिन मिठारी आदी उपस्थित होते.
झाडांची गळालेली पाने फुले, वेली, सालींनी बनला बाप्पा; कोल्हापुरातील धान्य व्यापारी मंडळाचा पर्यावरणाचा जागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:16 IST