Bank employees strike: सुट्ट्या, संपामुळे ३ हजार कोटींचे व्यवहार होणार ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:07 IST2025-03-21T17:07:10+5:302025-03-21T17:07:41+5:30
रमेश पाटील कोल्हापूर : बँकात नोकर भरती तातडीने करावी, पाच दिवसाचा आठवडा करावा, ग्रॅच्युईटीची रक्कम वाढवावी या मागण्यांसाठी शनिवारी ...

संग्रहित छाया
रमेश पाटील
कोल्हापूर: बँकात नोकर भरती तातडीने करावी, पाच दिवसाचा आठवडा करावा, ग्रॅच्युईटीची रक्कम वाढवावी या मागण्यांसाठी शनिवारी (दि.२२) व रविवारी (दि.२३) या दोन दिवसाच्या सुट्ट्यांना जोडूनच सोमवारी (दि.२४) व मंगळवारी (दि.२५) रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँका शनिवार पासून मंगळवार पर्यंत सलग चार दिवस बंद राहणार आहेत. सुट्ट्या आणि त्याला जोडून होणाऱ्या संपामुळेकोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. शिवाय ग्राहकांनाही त्याची मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे.
या संपात जिल्ह्यातील सर्व बँकांचे मिळून सुमारे दोन हजाराहून अधिक तर देशभरातील दहा लाखाहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात सुट्ट्यांना जोडून असा संप केला जातो. ऑल इंडिया बँक एम्प्लॉय असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसरर्स कॉन्फिडरेशन, नॅशनल कॉन्फिडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन या सर्व संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन मध्ये संपासाठी सहभागी झाल्या आहेत.
या संघटनामार्फत आतापर्यंत केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाशी अनेक वेळा चर्चा, बैठक्या झाल्या. मात्र चर्चेतून ठोस असा कोणताही निर्णय पुढे न आल्याने संघटनांनी संपाचे हत्यार उपसले.
राष्ट्रीयकृत १८ बँकेच्या २३५ शाखा
या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत १८ बँकेच्या २३५ शाखांचे सुमारे दोन हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी होणार असल्याने दररोज साडेसातशे कोटी रुपये याप्रमाणे चार दिवसाचे तीन हजार कोटी रुपयांचे व्यवहार संप काळात ठप्प होणार आहेत.
झळ इतर बँकांना..
संप जरी राष्ट्रीयकृत बँकांचा असला तरी त्याची झळ संपात नसलेल्या इतर बँकांच्या व्यवहाराला म्हणजेच १६ खाजगी बँकांच्या १८३, जिल्हा बँकेच्या १९१ व को-ऑपरेटिव बँकांच्या ४६५ शाखाना बसणार आहे.
या संपात सर्व बँकांचे मिळून सुमारे १० लाखाहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून दोन हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी असतील. - सुहास शिंदे, माजी व्हॉइस प्रेसिडेंट बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघटना