कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४३ लाख ७४ हजारांचा गंडा घालणारी स्नेहा संजय नारकर (वय ३५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) हिची दोन बँक खाती पोलिसांनी गोठवली. जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी नितीन दिलीप जंगम (४०, रा. जयसिंगपूर) यांच्याकडून उकळलेल्या पैशांचे तिने काय केले? तिचे अन्य कोण साथीदार आहेत काय? याचा शोध सुरू असल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले.व्यवसाय वाढविण्यासाठी दीड कोटींचे कर्ज मिळवून देण्यासह बँकांमधील तारण सोने आणि कार कमी पैशात मिळवून देण्याचे आमिष दाखवून स्नेहा नारकर हिने नितीन जंगम यांना ४३ लाख ७४ हजारांचा गंडा घातला आहे. या गुन्ह्यात नारकर हिला अटक झाली असून, बँकांशी पत्रव्यवहार करून तिची दोन खाती गोठवली आहेत. दोन्ही खात्यांवरील बहुतांश रक्कम काढून घेतल्याचे दिसत आहे.काही मोजकी रक्कम पुढे तीन ते चार खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने वर्ग झाली आहे. रक्कम वर्ग झालेल्या खातेदारांची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नारकर हिने फसवणुकीतील रकमेचे काय केले याचा तपास सुरू आहे. गेल्या वर्षभरात तिने केलेल्या खरेदीची माहिती घेतली जात आहे, असे तपास अधिकारी उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी सांगितले.कॉल डिटेल्समधून मिळणार महत्त्वाची माहितीनारकर हिच्या कॉल डिटेल्सची माहिती पोलिसांनी मागवली आहे. फसवणूक काळात तिने कोणाला कॉल केले? ती कुठे कुठे फिरली, मुक्काम कुठे केला, तिच्या सोबत कोण होते? यातून महत्त्वाची माहिती हाती लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने तिला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Kolhapur: पुजाऱ्याची फसवणूक करणाऱ्या महिलेची बँक खाती गोठवली, कॉल डिटेल्स मागवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:19 IST