Kolhapur: बाळूमामा देवस्थानने रस्ता नसताना वाहनतळासाठी निढोरीत घेतली जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:46 IST2025-10-10T17:45:09+5:302025-10-10T17:46:17+5:30
शेतजमिनी घेताना नियम पायदुळीची तक्रार

Kolhapur: बाळूमामा देवस्थानने रस्ता नसताना वाहनतळासाठी निढोरीत घेतली जागा
शिवाजी सावंत
गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थान समितीने निढोरी (ता. कागल) येथे वाहनतळ उभारणीसाठी गट नंबर ४३९ मधील ३७.५० गुंठे जमीन खरेदी केली आहे. मात्र, या जमिनीकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता किंवा पाणंद मार्ग उपलब्ध नाही अशा अडचणीच्या ठिकाणी कोणता तळ उभा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या जमिनीचे मूळ मालक आनंदा शंकर देवळे यांनी वटमुखत्यारपत्र तन्मय दत्तात्रय बाचणकर यांच्या नावे दिले होते. बाचणकर यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी ही जमीन ३ कोटी ५१ लाख ४५० रुपयांना देवस्थानला विकली. निढोरी गट नंबर ४३४ मधील ७२ गुंठ्यांपैकी ५६ गुंठे जमीन देवस्थान समितीने २५ सप्टेंबर २०२५ रोजी खरेदी केली. या जमिनीबाबत विठ्ठल मारुती पाटील व बंडेराव मारुती पाटील या भावांना ५ कोटी २४ लाख २२ हजार ७२० रुपये मोबदला देण्यात आला. नगररचना विभागाने एनए (बिगरशेती) परवानगी दिलेली नसताना जमिनीचे पैसे चौरस फूट दराने अदा करण्यात आले. खरेदी मात्र शेतजमीन म्हणून दाखवल्याची तक्रार आहे.
वाचा : बाळूमामा देवस्थानने दीड कोटी मोजून खरेदी केलेली जमीन कागदोपत्री, प्रत्यक्षात जागा गायब
सुमारे दोन कोटी चोवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातून अन्य व्यक्तींच्या नावे का वर्ग झाले याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. त्यासंबंधीचे निवेदन प्रातांधिकाऱ्यांना गुरुवारी प्रवीण पाटील (बिद्री), रवींद्र पाटील (फये) आणि हणमंत पाटील (आकुर्डे) यांनी दिले.
मूळ जमीनमालक,वटमुखत्यारपत्रधारक,देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त व संबंधित कारभारी यांची चौकशी करण्याची मागणी भक्त प्रवीण पाटील (बिद्री.ता.कागल) यांनी केली आहे.
जमीनखरेदीत विश्वासात घेतले नाही
देवस्थान समितीचे विश्वस्त दिलीप पाटील म्हणाले, निढोरी येथील प्रत्यक्षात दाखवलेली जमीन न घेता दुसऱ्याच जमिनी खरेदी केल्या आहेत. या जमिनी खरेदी करताना आदल्या दिवशी वीस लाख रुपयांना वटमुखत्यारपत्र झालेली जमीन दुसऱ्या दिवशी साडेतीन कोटी रुपयांना विकत घेताना कार्याध्यक्ष, सचिव यांनी आम्हा विश्वस्तांना कोणतीही कल्पना दिलेली नाही अथवा बैठक घेऊन बहुमताचा ठराव मंजूर केलेला नाही.
मानद अध्यक्षांची चौकशीची मागणी
या संदर्भात देवस्थान समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता ते म्हणाले, संत बाळूमामा देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. भक्तांच्या दानातून जमिनी खरेदीच्या नावाखाली हेराफेरी झाल्याची शंका आहे. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून निकोप चौकशी करावी.