रस्त्यात खड्डे आणि चर, बाद झाली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:58 PM2021-11-25T13:58:30+5:302021-11-25T13:59:50+5:30

समीर देशपांडे कोल्हापूर : ज्या रस्त्यावरून शेकडो वाहने रोज ये जा करतात, लाखो नागरिक प्रवास करतात ते रस्ते किमान ...

Bad condition of roads in Kolhapur city | रस्त्यात खड्डे आणि चर, बाद झाली कंबर

रस्त्यात खड्डे आणि चर, बाद झाली कंबर

googlenewsNext

समीर देशपांडे
कोल्हापूर : ज्या रस्त्यावरून शेकडो वाहने रोज ये जा करतात, लाखो नागरिक प्रवास करतात ते रस्ते किमान ठाकठीक असावेत अशी अपेक्षा कर भरणाऱ्या नागरिकांनी केली तर त्यात वावगे काहीच नाही. परंतू कोल्हापुरात मात्र रस्त्यावरील खड्डे भरण्यापासून ते चर मुजवण्यापर्यंत इतकी उदासीनता आहे की अनेकांचे कंबरडे ढिले होण्याची वेळ आली आहे.

प्रस्तुत प्रतिनिधीने छायाचित्रकारासह बुधवारी सकाळी अर्ध्या तासात दसरा चौक ते ताराराणी पुतळा असा प्रवास केला. येता जाता केवळ तीन किलोमीटरच्या या रस्त्यामध्ये वाहनधारकांना येणाऱ्या अडचणी पाहिल्या तर त्या दूर करण्यासाठी नेमकी ठोस पावले कधी उचलली जाणार आहेत, असा सवाल उपस्थित होतो.

हॉकी स्टेडियमकडून दसरा चौकात जो रस्ता येतो आणि दसरा चौकातून जो रस्ता व्हीनस कॉनर्रकडे जातो या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी चर मारण्यात आले आहेत. ते मुजवण्यातही आले. परंतु चारच दिवसांत यात खडी अजिबात शिल्लक नाही. त्यामुळे गाड्या दणकतच पुढे न्याव्या लागत आहेत. सरळ खाली येताना पुढेच सुतार मळ्याच्या अलीकडे रस्त्यातच मोठा खड्डा आहे. एखादा वेगात आलेला दुचाकीस्वाराची गाडी या खड्ड्यात गेली तर त्याचा मणकाच मोडेल असा हा खड्डा आहे.

दाभोळकर कॉनर्रकडे जाताना कोरगावकर कंपाऊडसमोर रस्त्यापेक्षा वर आलेली दोन मनहोल आहेत. अशी अनेक ठिकाणी आहेत. ती चुकवण्यासाठी दुचाकीस्वार या बाजुला आणि त्या बाजुला गाड्या घेताना छोटे मोठे अपघात होतच राहतात. दाभाेळकर कॉर्नर ते भूविकास बॅंकेच्या चौकापर्यंत डाव्या बाजुचा रस्ता विभागला गेला आहे. रस्त्याच्या मध्येच असमतोलपणा निर्माण झाल्याने त्यावरून दुचाकी नेताच येत नाहीत.

पाण्याने अडवले निम्मे रस्ते

- रस्त्यावरील पाण्याचा निचरा करायची जबाबदारी महापालिकेची असताना वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी पाणी साठून निम्मा रस्ताच वापरला जात नाही. त्यामुळे सातत्याने त्या त्या परिसरात वाहतुकीची कोंडी होते.

- ताराराणी पुतळ्याला वळसा घालून पुन्हा दसरा चौकाकडे येताना लगेचच एका बाजुला एवढे पाणी साठते की हा निम्मा रस्ता पाण्यातच जातो. हाच प्रकार दाभोळकर कॉनर्रवरील सिग्नजवळ दिसून येतो. खड्डे आणि पाणी यातच वाहने उभी केली जातात.

- याची पुनरावृत्ती व्हीनर्स कॉनर्रवर होते. येथे तीन महिने रस्ता बंद ठेवून चनेल बांधण्यात आले. परंतु थोड्या पावसानेही येथ पाणी साठते. खड्डेही आहेत. मग हे खड्डे मुजवणार कोण आणि रस्त्यावरील पाणी बाहेर काढायचे कोणी?

शरीराचे आणि गाड्यांचेही नुकसान

शहरातील एका रस्त्यावरील हे चित्र आहे. या चरींमुळे आणि खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होते ते होतेच परंतु शरीराची जी झीज होते. मणक्याला जो दणका बसतो त्याचे नुकसान कशात मोजायचे आणि त्याची भरपाई कोणी करायची. रस्त्यावरील एक चर, एक मोठा खड्डा अनेकांना महिनोमहिने त्रास देत असताना ते मुजवण्याची तत्काळ कार्यवाही का होत नाही याचे उत्तर कोणाकडे नाही.

रस्त्याकडेच्या गाड्यांचे काय?

मुख्य रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यापेक्षा आतील गल्लीत लावण्याला प्राधान्य देवून तशी व्यवस्था केली गेली तर शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहनधारकांची मोठी सोय होईल. शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर तरी अशा पद्धतीने पर्याय देता येतील का याचा विचार करण्याची गरज आहे.

Web Title: Bad condition of roads in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.