कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात बाळ दगावले, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; नातेवाईकांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:36 IST2025-04-23T13:35:39+5:302025-04-23T13:36:21+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात चार दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ दगावल्याची घटना मंगळवारी पहाटे समोर आली. या घटनेमुळे संतप्त ...

कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात बाळ दगावले, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; नातेवाईकांचा गोंधळ
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात चार दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ दगावल्याची घटना मंगळवारी पहाटे समोर आली. या घटनेमुळे संतप्त नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप करत सुमारे चार तास रुग्णालयात गोंधळ घातला. काही कार्यकर्ते डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचा तसेच चौकशी समिती नेमून दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय झाल्यानंतर मृत बाळ नातेवाईकांनी ताब्यात घेतले.
मूळच्या संगमनेर तालुक्यातील पिंपळगांव येथील व सध्या कोल्हापुरातील माळी गल्ली येथे वास्तव्यास असलेल्या सान्वी सूरज गावडे (वय २४) यांनी गरोदर राहिल्यानंतर सावित्रीबाई फुले रुग्णालयात नोंदणी केली. शनिवारी पहाटे त्यांनी मुलाला जन्म दिला. प्रसुतीवेळी थोडी अडचण आल्याने चिमटे लावून प्रसुती (व्हेंट्यूज डिलिव्हरी) करण्यात आली. खबरदारी म्हणून बाळाला बालरोग कक्षात दाखल केले. दोन तासांनी बाळाची तब्बेत ठणठणीत असल्याची खात्री केल्यानंतर आईच्या ताब्यात देण्यात आले.
सोमवारी दुपारी बाळाच्या नातेवाईकांनी बाळाचे अंग पिवळे दिसत असल्याची तक्रार केली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पुढील तपासण्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून उद्या केल्या जातील, असे सांगण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी त्याची हालचाल व श्वासोच्छवास बंद असल्याचे दिसून आले. त्यांनतर डॉ. पी. जी. कदम व ड्युटीवरील नर्सनी बाळाची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे निदर्शनास आले.
बाळाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला. ही बाब नातेवाईक तसेच अन्य सामाजिक कार्यकर्त्यांना समजताच सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी रुग्णालयात गर्दी केली. डॉक्टर, नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आराेप त्यांनी केला. आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, अधीक्षक डॉ. संजना बागडी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी काहीजण डॉक्टरांच्या अंगावर धावले. पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन दोन्ही बाजूशी चर्चा केली. तक्रार असल्यास गुन्हा दाखल करा, अशी सूचना पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी केली. त्यावेळी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.
चौकशी समिती नेमणार : पावरा
बाळाची तब्बेत चांगली असताना बाळ कसे दगावले, याची चौकशी करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी केली जाईल. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी सांगितले.