सचिन जवळकोटे, कार्यकारी संपादक, काेल्हापूर/ एकेकाळी राज्याला चार मुख्यमंत्री देणाऱ्या ‘दक्षिण महाराष्ट्रा’त सध्या ‘हात’वाल्यांचे केवळ तीनच प्रमुख नेते टिकून राहिलेले. ‘कऱ्हाड’मध्ये ‘पृथ्वीराज’ हे ‘बाबा’ म्हणून ओळखले गेलेले. ‘कडेगाव’च्या ‘विश्वजित’ना ‘बाळासाहेब’ म्हणून संबोधित गेलेलं. ‘कोल्हापूर’चे ‘पाटील’ तर ‘बंटी’ म्हणूनच फेमस. अशा या तीन नेत्यांच्या टोपणनावाची सुरुवात ‘बी’ अक्षरानं झालेली. सत्तांतरानंतरच्या वादळात सापडलेल्या ‘हात’ पार्टीला शाबूत ठेवण्यासाठी या तीन नेत्यांचा ‘प्लॅन बी’च भविष्यात उपयोगी ठरू शकणारा. याच ‘प्लॅन’चं उलगडत नेलेलं कोडं. लगाव बत्ती...
‘महाराष्ट्रा’चं नेतृत्व सर्वाधिक काळ केलं ते याच ‘दक्षिण महाराष्ट्रा’नं. ‘यशवंतराव, वसंतदादा, बाबासाहेब अन् पृथ्वीराजबाबा’ यांनी आपल्या ‘सीएम’पदाची कारकीर्द गाजवलेली. खरंतर, ‘हात’वाल्यांसाठी सत्तांतर तसं नवं नसलेलं. गेलेली सत्ता पुन्हा कशी खेचून आणायची, यात या ‘हात’वाल्यांचा ‘हात’ आजपावेतो कुणीच धरू न शकलेला, मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट. प्रसंग अत्यंत बाका. गेली ‘अकरा वर्षे’ थांबलेल्यांसाठी मात्र आता पुढची ‘चार वर्षे’ वाट पाहण्याची सहनशक्ती बिलकुल न राहिलेली. सत्ता असताना पक्ष कसा वाढवायचा, याचं बाळकडू नेत्यांना मिळालेलं. मात्र, सत्ता नसताना पक्ष टिकवायचा कसा, हा चक्रव्यूह भेदणं अवघड झालेलं. त्यातूनच गावोगावी ‘पक्षांतरा’चे इव्हेंट साजरे होऊ लागलेले. लगाव बत्ती..
‘कोल्हापूर’ जिल्ह्यात एकेकाळी दोनच शब्द परवलीचे. ‘काँग्रेस’ म्हणजे ‘पीएन’.. अन् ‘पाटील’ म्हणजेच ‘काँग्रेस’. अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या ‘पीएन’ यांच्या पक्षानं कैक आमदार-खासदार निवडून दिलेले. आता याच ‘पाटलांचे चिरंजीव’ थेट ‘सत्तेत’ सहभागी होण्यासाठी ‘दादांचं घड्याळ’ हातात बांधू लागलेले. आजपावेतो कैक नेते पक्षातून गेलेले. मात्र, हा धक्का जुन्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठा ठरलेला. निष्ठा दोन पिढ्यांमध्ये विभागली गेलेली. ‘पाटील घराण्या’वर श्रद्धा ठेवणारे ‘राहुलदादां’सोबत गेलेले. ‘पीएन’ यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारे ‘बावड्याच्या पाटलां’सोबतच राहिलेले.
आयुष्यभर ‘हाता’सोबत राहणारी नेतेमंडळी एका रात्रीत का बदलताहेत, या प्रश्नाचं उत्तर शोधता-शोधता गेली कैक वर्षे कार्यकर्ते दमून गेलेले. संस्था टिकविण्याची ‘मानसिकता’ या नेत्यांची ‘हतबलता’ बनून गेलेली. ‘इचलकरंजी’ची कारणं मात्र वेगळी ठरलेली. गेल्यावर्षीच्या ‘आमदारकी’ला जनतेनं नवा अजेंडा जाहीर केलेला. ‘आवाडे’ हवेत; परंतु ‘कमळ’ही पाहिजे, हा विचित्र सर्व्हे ‘प्रकाशअण्णां’ना नवी भूमिका घ्यायला लावणारा ठरलेला. ज्यांनी ‘जिल्हाध्यक्ष’ पदाच्या काळात ‘हात कार्यालयाला’ झळाळी निर्माण करून दिली, तेच आता नाईलाजानं ‘कमळ’मय बनलेले.
झपाट्यानं ढासळत चाललेली परिस्थिती ‘बंटी’ अत्यंत शांतपणे पाहू लागलेले. ‘नेते’ गेले तरी ‘कार्यकर्ते’ आपल्या सोबत राहतील, या आशेवर गावोगावी दाैरे करू लागलेले. सत्ताधाऱ्यांच्या छावणीतील नव्यांच्या ‘अतिक्रमणा’मुळे जुन्यांचं होणारं ‘खच्चीकरण’ आपल्याला कैक बंडखोर मिळवून देतील, या हिशेबानं पुढच्या निवडणुकांची समीकरणं जुळवू लागलेले. वादळापूर्वीची शांतता बरंच काही शिकवून जाऊ लागलेली. यालाच ‘बंटीं’चा ‘प्लॅन बी’ म्हटला जाऊ लागलेला. लगाव बत्ती..२०१४च्या सत्तांतरापूर्वी ‘कऱ्हाड’ शहर राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनलेलं. तत्कालीन ‘सीएम’ अर्थात ‘पृथ्वीराजबाबां’साठी तगडी फाैज सातारा जिल्ह्यात काम करू लागलेली. ‘म्हसवडचे जयाभाव, कऱ्हाडचे अतुलबाबा अन् फलटणचे रणजितदादा’ हे ‘बाबां’चे खास शिलेदार बनलेले.. मात्र, सत्तेचा महिमा अगाध ठरलेला.
हे तिघेही आता ‘फडणवीसां’चे विश्वासू सेनापती झालेले. संघर्षासाठी तीन पिढ्या प्रसिद्ध असलेल्या ‘उंडाळकरां’चे ‘उदयसिंहदादा’ही अखेर सत्ताधाऱ्यांसोबतच गेलेले.नाही म्हणायला ‘मलकापूर’चे ‘मनोहरभाऊ’ अन् ‘निमसोड’चे ‘रणजितभैय्या’ अजूनही ‘हातात हात’ घालून झंझावाताशी सामना करण्यासाठी उभे ठाकलेले. खरंतर, ‘भैय्यां’ना सत्ता असतानाही कधी सत्तेतला वाटा न मिळालेला. त्यामुळंच आता बिनसत्तेचा ‘जिल्हाध्यक्ष’ बनून लढण्यात त्यांना मजा वाटू लागलेली. राहता राहिला विषय ‘भाऊं’चा. त्यांची ‘गोकाक’ पाणी पुरवठ्याची निवडणूक बिनविरोध घडवून आणणाऱ्या ‘अतुलबाबां’ची भूमिका चक्रावून ठरणारी. भविष्यात ‘मलकापुरा’तही काही धक्कादायक घडू शकतं की काय, या जाणिवेनं कार्यकर्ते आतापासूनच धास्तावलेले. मात्र, ‘कृष्णा’चा दरबार परंपरागत विरोधकांनी अगोदरच खचाखच भरलेला. त्यामुळं ‘घड्याळ’ किंवा ‘बाण’सारखे पर्याय उभे असले तरीही ‘मनोहरभाऊ’ अद्याप ‘हाता’शीच ठामपणे प्रामाणिक राहिलेले. या साऱ्या परिस्थितीतही थेट ‘मोदी-शहां’वर आक्रमकपणे टीका करणाऱ्या ‘पृथ्वीराजबाबां’चा ‘प्लॅन बी’ उत्सुकतेचा ठरलेला. लगाव बत्ती..
‘सांगली’त तर परवा कहरच झालेला. ‘हात’वाल्यांचे चक्क ‘शहर जिल्हाध्यक्ष’च ‘कमळाचा हार’ घेऊन फोटो फ्लॅशमध्ये चमकलेले. खरंतर, या ‘पृथ्वीराजबाबा सांगलीकरां’च्या पक्षांतराची बीजं ‘आमदारकी’च्या निवडणुकीतच रोवली गेलेली. ‘आपला पराभव झाला, यापेक्षा आपल्याच हातवाल्या कार्यकर्त्यांनी साथ दिली नाही’, हे दु:ख परवाच्या सोहळ्यात प्रकर्षानं जाणवलेलं. फुलांच्या पाकळ्यांनी हळूवारपणे प्रकट केलेलं. खरंतर, ही घोषणा होण्यापूर्वी मुंबईत ‘बाबां’ची ‘विश्वजित’ यांच्यासाेबत गुप्त चर्चाही केलेली. मात्र, निर्णयावर ‘पाटील’ ठाम राहिलेले.
गंमत म्हणजे, सांगलीत त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या ‘जयश्रीताईं’नीही एक महिन्यापूर्वी प्रवेश केलेला. आता या ‘वसंत काॅलनी’त तिसऱ्या ‘पाटलां’च्याही बंगल्यात पार्टी ऑफिस असावं, हा योगायोगाचाच भाग समजावा. तिसरे म्हणजे ‘वाळव्याचे जयंतराव’ हाे. असो. माणसं टिकवण्याचं मॅनेजमेंट ‘कदमां’च्या मतदारसंघात दिसलेलं. फक्त सांगली जिल्ह्यातही याचा प्रयाेग व्हायला हवा, असं निष्ठावान कार्यकर्त्यांना वाटू लागलेलं. एकेक नेते टप्प्याटप्प्यानं जात असतानाही उरलेल्या कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्याचा ‘प्लॅन बी’ नक्कीच ‘बाळासाहेबां’कडे असलेला. लगाव बत्ती..