Audit Oxygen Tank, Cylinder: Collector Daulat Desai | ऑक्सिजन टँक, सिलिंडरचे ऑडिट करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई 

ऑक्सिजन टँक, सिलिंडरचे ऑडिट करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई 

ठळक मुद्देऑक्सिजन टँक, सिलिंडरचे ऑडिट करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई  शासकीय, खासगी रुग्णालयांना आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील खासगी व शासकीय कोविड रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेला टँक व सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे तातडीने ऑडिट करा, लिक्विड ऑक्सिजन टँक व ऑक्सिजन जनरेटर असलेल्या ठिकाणी तातडीने सी.सी. टीव्ही लावावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी शासकीय व खासगी रुग्णालयांना दिले.

या आदेशाचे पत्र राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, इंदिरा गांधी जनरल हॉस्पिटल इचलकरंजी, पायोस हॉस्पिटल जयसिंगपूर, ॲपल सरस्वती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, ॲस्टर आधार हॉस्पिटल, अथायू हॉस्पिटल उजळाईवाडी, डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सुशीलदत्त हॉस्पिटल इचलकरंजी, सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरीवाडी व सर्व कोविड रुग्णालयांना पाठविण्यात आले आहे.

या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व रुग्णालयातील ऑक्सिजन टँक, त्याचा पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली पाईपलाईन, पाईप व्हॉल्वस, सिलिंडर यंत्रणा हे सर्व सुरक्षित आहेत का, या ठिकाणी कोणताही ज्वालाग्रही पदार्थ, तसेच गळती नाही याची खात्री करावी. असे आढळल्यास तातडीने त्या हटविण्यात याव्यात. तसेच ऑक्सिजन टँक व सिलिंडरच्या सुरक्षितेची खबरदारी घ्यावी. रुग्णालयातील अंतर्गत वायरिंगची त्वरित सुरक्षा तपासणी करावी. तसेच प्रत्येक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा तयार ठेवावी अशा सूचना केल्या आहेत.

 

Web Title: Audit Oxygen Tank, Cylinder: Collector Daulat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.