Jyotiba Temple: पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर पहिली मानाची सासनकाठी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 15:45 IST2022-04-02T15:44:35+5:302022-04-02T15:45:54+5:30
आज मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा वर्षातून एकदाच बांधण्यात येते. दहा गावकऱ्यांनी ही महापूजा बांधली.

Jyotiba Temple: पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर पहिली मानाची सासनकाठी दाखल
जोतिबा : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आज जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या तसेच जोतिबा परिसरातील सासनकाठ्या पारंपरिक पद्धतीने सजवून दिमाखात उभ्या केल्या. दरम्यान, आज मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा वर्षातून एकदाच बांधण्यात येते. दहा गावकऱ्यांनी ही महापूजा बांधली.
तर, सकाळी अकरा वाजता निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहाद्दूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी सवाद्य मिरवणुकीने डोंगरावर दाखल झाली. मुख्य मंदिर परिसरात आल्यावर ही सासनकाठी ग्रामस्थ व भाविकांनी नाचविली. या वेळी संग्रामसिंह चव्हाण, रणजितसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, नुतन लोकनियुक्त सरपंच राधा बुणे, देवस्थान समितीचे अधिक्षक दिपक म्हेत्तर ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते.
मानाची सासनकाठी मंदिर परिसरात आल्यावर गुलाल-खोबऱ्याची उधळण झाली. "जोतिबाच्या नावानं चांगभलं‘चा जयघोष करत भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्या. त्यानंतर सासनकाठी सदरेजवळ उभी केली. दुपारी १२ वाजता तोफेची सलामीने नवीन पंचागाचे विधीवत श्रीचे मुख्य पुजारी यांचे हस्ते पुजन करण्यात आले. ग्रामोपाध्ये केरबा उपाध्ये यांनी पंचांग वाचन केले. गुळलिंबाचे वाटप झाले .
निनाम पाडळी (जि. सातारा), मौजे विहे (ता. पाटण), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (ता. कऱ्हाड), छत्रपती (करवीर), कवठेगुलंद (सांगली), मनपाडळे (हातकणंगले), फाळकेवाडी, दरवेश पाडळी, सांगली, सातारा, कऱ्हाड, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, लातूर आदी भागातील मानाच्या सासनकाठ्या उभ्या करून त्या त्या गावात जोतिबा चैत्र यात्रेसाठी केव्हा जायचे, याचे नियोजन केले.
१२ एप्रिल रोजी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर डोंगरावर चैत्र यात्रेसाठी भाविक येण्यास प्रारंभ होईल. बेळगाव, कर्नाटक भागातील पायी, बैलगाड्या घेऊन येणारे भाविक डोंगरावर दाखल होतील. यात्रेचा मुख्य दिवस १६ एप्रिल आहे.