अष्टमीला अंबाबाई महिषासुरमर्दिनी रूपात - रात्री नगरप्रदक्षिणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:10 IST2020-10-24T19:08:47+5:302020-10-24T19:10:43+5:30
Navratri, kolhapur, ambabaitemple, dasra शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला अष्टमीनिमित्त शनिवारी कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता देवीची वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यंदा कोरोनामुळे सजविलेल्या ट्रॅक्टरमधून हे वाहन नेण्यात आले.

शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीनिमित्त शनिवारी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ) -
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला अष्टमीनिमित्त शनिवारी कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता देवीची वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यंदा कोरोनामुळे सजविलेल्या ट्रॅक्टरमधून हे वाहन नेण्यात आले.
नवरात्रौत्सवात अष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सर्व देवांच्या तेजातून प्रकटलेल्या अष्टा दशभुजा अंबाबाईने म्हणजे दुर्गेने महिषासुराचा संहार केला होता. भारतातील ५१ शक्तिपीठांच्या यादीत करवीरसाठी करवीरे महिषमर्दिनी असा उल्लेख येतो. जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे उग्र रूप घेतले.
शक्तिपीठांच्या परंपरेप्रमाणे करवीरक्षेत्री आदिशक्तीचे स्वरूप असणाऱ्या माता सतीचे त्रिनेत्र पडले तेथे देवीने महिष मर्दिनीरूपाने विहार केला, अशी आख्यायिका आहे. तिला अनुसरूनच नवरात्राच्या या अष्टमीला करवीरनिवासिनीची महिषासुरमर्दिनी रूपातील अलंकार पूजा बांधली जाते. ही पूजा प्रसाद लाटकर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
शाही दसरा सोहळा रद्द
दरवर्षी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा होतो. येथे अंबाबाई, तुळजाभवानी देवींच्या पालख्या येतात. छत्रपतींच्या उपस्थितीत शमीपूजन होते. यंदा कोरोनामुळे हा शाही दसरा सोहळा रद्द करण्यात आला आहे. प्रातिनिधिक स्वरूपात शमीपूजन होईल.