Kolhapur: सांबरांसह भेकरची संख्या वाढविली, आता टप्याटप्याने आणणार वाघ; स्थलांतरणाची प्रक्रिया कशी.. वाचा
By संदीप आडनाईक | Updated: September 13, 2025 19:18 IST2025-09-13T19:17:08+5:302025-09-13T19:18:45+5:30
वाघ वाढविण्यासाठी ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’चे नियोजनबद्ध प्रयत्न

संग्रहित छाया
संदीप आडनाईक
कोल्हापूर : मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ टप्प्याटप्याने दोन महिन्यांपर्यंत सह्याद्री अभयारण्यात स्थलांतर केले जाणार आहेत. वाघांची संख्या वाढावी यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले. राखीव वनजमिनीत शेती करून या वाघांचे खाद्य असलेल्या सांबर, भेकर आदी प्राण्यांची संख्या वाढवली आहे. या प्रकल्पात आता २७ वाघ राहू शकतील इतकी खाद्याची व्यवस्था असल्याचे या प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले.
वाघांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा अधिवास पूरक असल्यामुळे स्थानांतरणासाठी सर्वांत महत्त्वाची बाब असणारी परवानगी मिळाली आहे. ताडोबा आणि पेंच या वेगळ्या प्रदेशातून (लँडस्केप) टप्प्याटप्याने वाघ आणले जाणार आहेत. त्यासाठी मोठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यांना पकडण्यापासून त्यांचा प्रवास, वैद्यकीय तपासण्या आणि बदललेला भूप्रदेश यामुळे त्यांच्यावर निर्माण झालेला ताण हलका करून मग त्यांना वन्य अधिवासात सोडले जाईल. यामुळे त्यांची या परिसरामध्ये टिकून राहण्याची शक्यता अधिक वाढणार आहे. यासाठी व्यवस्थित तयारी केली जात आहे.
नियोजनबद्ध प्रयत्न
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढावी यासाठी वनखात्याने २०१७ पासून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पात वाघांचा अधिवास असण्यासाठी संरक्षण, तृणभक्षी प्राणी आणि अबाधित जंगल या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये २७ हून अधिक वाघ वास्तव्यास राहू शकतात, अशी माहिती तुषार चव्हाण यांनी दिली. त्यापैकी ४५० चौरस किलोमीटर क्षेत्रात आता वाघांचं स्थानांतरण करता येणार आहे. चांदोलीजवळच्या सागरेश्वर अभयारण्यातून २०२१ पासून चितळ स्थानांतरित करण्याचा ’प्रे-ऑगमेंटेशन’ प्रकल्प चालू आहे. याशिवाय इतर ठिकाणांवरूनही तृणभक्षी प्राणी आणण्याच्या परवानग्या मिळाल्या आहेत.
अशी असेल वाघ स्थलांतरणाची प्रक्रिया
विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त ५० वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करताना टप्प्याटप्प्याने म्हणजे प्रथम एक किंवा दोन वाघ सह्याद्रीत स्थलांतर केल्यानंतर त्यांचे मॉनिटरिंग करण्यात येईल. हे वाघ सह्याद्रीत रमले की नाही, या निरीक्षणाअंती पुढील निर्णय घेऊन इतर वाघ आणले जातील. या साऱ्या प्रक्रियेला किमान दोन महिने लागू शकतील.