अरुण डोंगळेंसह सातजणांना जामीन
By Admin | Updated: July 10, 2014 23:46 IST2014-07-10T23:45:59+5:302014-07-10T23:46:31+5:30
क्रिकेट सामन्यावरील बेटिंग प्रकरण

अरुण डोंगळेंसह सातजणांना जामीन
कोल्हापूर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका क्रिकेट मॅच बेटिंगप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह सात जणांना आज, गुरुवारी मुख्य न्यायाधीश एस. आर. साळोखे यांनी जामीन मंजूर केला. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल अॅम्बेसेडरमध्ये लक्ष्मीपुरी पोलिसांनी काल, बुधवारी रात्री छापा टाकून पाचजणांना अटक केली होती.
शाहूपुरी येथील हॉटेल अॅम्बेसेडरमध्ये रुम नंबर २०५ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकून संशयित हॉटेल मालक धीरज विजयसिंह डोंगळे, मॅनेजर सरदार सखाराम कांबळे, बेटिंग एजंट गोपीचंद रमेशलाल आहुजा, चेतन राजू उत्तम गिरवे, संजय रामकुमार छाबडा यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली.
दरम्यान, हॉटेल मालक ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुणकुमार गणपतराव डोंगळे, त्यांचा भाऊ विजयसिंह गणपतराव डोंगळे यांच्या संमतीने बेटिंग घेतल्याच्या संशयावरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी डोंगळे बंधूंची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. डोंगळे यांच्यातर्फे अॅड. धनंजय पठाडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)