कोल्हापूर : राजकारणात दिलेला शब्द आणि विश्वासार्हता महत्त्वाची असते आणि ती जपली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे अरूण डोंगळे यांनी अजूनही कोणतीही खळखळ न करता ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा तत्काळ द्यावा, अशी अपेक्षा सत्तारुढ आघाडीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी व्यक्त केली. संघातील राजकीय घडामोडीबद्दल ‘लोकमत’ने त्यांची भूमिका जाणून घेतली. डोंगळे यांना खुर्चीची हाव सुटत नाही म्हणून हे सगळे सुरू झाल्याची टिप्पणी त्यांनी केली.मुश्रीफ म्हणाले, संघात आमची सत्ता आल्यावर विश्वास पाटील अध्यक्ष झाले. तेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेलो. त्यांनी ठरल्याप्रमाणे डोंगळे यांना अध्यक्ष करा, असे सांगितले होते. तो शब्द आम्ही पाळला. आता डोंगळे यांना मुदतवाढ हवी होती तर ते उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे का गेले नाहीत, याचे उत्तर त्यांनी द्यावे. डोंगळे स्वत: व त्यांचा मुलगा आजही राष्ट्रवादीत आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. आम्हीही त्यांना भेटून वस्तूस्थिती समजावून सांगू.गेल्या निवडणुकीत आम्ही जेव्हा सत्तारुढ आघाडीच्या विरोधात एकत्र आलो तेव्हा पक्षीय विचार नव्हता. माजी आमदार महादेवराव महाडिक, काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पी. एन. पाटील, शिवसेनेचे सत्यजीत पाटील यांच्याविरोधात आम्ही आघाडी केली. तेव्हा आघाडी, युती असा विषयच नव्हता. तेव्हा आता अशी भूमिका घेणे योग्य नाही.
डोंगळे यांनाही महायुतीचा साक्षात्कार राजीनामा देतानाच कसा झाला..त्यांनी त्यांची काही अपेक्षा असेल तर आमच्याशी चर्चा करायला हवी होती. संघ आम्ही पक्षविरहित राजकारण करत उत्तम चालवला आहे आणि यापुढेही आम्ही सर्व एकत्र राहून तो चांगला चालवू, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.