But the army's 'health retirees' will come in handy, too | तर लष्कराचे ‘आरोग्य सेवानिवृत्त’ही मदतीस येणार- : कोरोना लढ्यासाठी ४९ जणांची तयारी

तर लष्कराचे ‘आरोग्य सेवानिवृत्त’ही मदतीस येणार- : कोरोना लढ्यासाठी ४९ जणांची तयारी

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : कोरोनाच्या लढाईसाठी वेळ आली तर लष्कराच्या आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी मैदानात उतरणार आहेत. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ४९ जणांनी यासाठी तयारी दर्शविली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जगालाच विळखा घातला आहे. यातून देश, राज्य व जिल्हाही सुटलेला नाही. परिस्थिती अधिक गंभीर झाली तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आरोग्याधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर लष्करातील निवृत्त आरोग्याधिकारी व कर्मचाºयांबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडेही विचारणा करण्यात आली. त्यावर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी ४९ जणांची लष्करातील निवृत्त आरोग्याधिकारी, कर्मचाºयांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केली. त्यांच्याशी सासने यांनी वैयक्तिक फोनद्वारे चर्चा करून मते जाणून घेतली. त्यावर सर्वांनी आम्ही केव्हाही या लढाईसाठी तयार असल्याचे सांगितले.

लष्करातील आरोग्य विभागात २० ते २५ वर्षे या सेवानिवृत्त कर्मचाºयांनी सेवा बजावली आहे. त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीवर आहे. तत्पूर्वी त्यांना सीमेवर रक्त सांडणाºया जवानांची मलमपट्टी करणारे हे हात गरज पडल्यास कोरोना विषाणूने संसर्ग झालेल्यांची
शुश्रूषा करण्यास मागे हटणार नाहीत; कारण सीमेवर लढणा-या सैनिकाच्या खांद्याला खांदा लावून देशसेवा करणा-या या निवृत्त कर्मचा-यांसाठी ही देशसेवाच आहे.

नेहमीच संकटाच्या छायेत काम करून जखमी सैनिकांसाठी काम करणाºया या सेवानिवृत्तांसाठी पुन्हा एकदा लढण्याची संधी आली आहे. अजून तरी कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्याधिकारी व कर्मचा-यांची आवश्यकता जिल्हा प्रशासनाला लागलेली नाही; परंतु तशी वेळ आल्यास हे जवान लढाईसाठी मैदानात उतरणार हे मात्र निश्चित आहे.


लष्करातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लखनौत प्रशिक्षण
लष्करात आरोग्यसेवा करण्यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांना लखनौ येथील ‘आर्मी मेडिकल कोअर’ केंद्रातून प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रातून वरील ४९ जणांनी प्रशिक्षण घेऊन पुढे २० ते २५ वर्षे सेवा बजावली आहे. फिजिओथेरपिस्ट, कंपौंडर, लॅब असिस्टंट, रुग्णवाहिकेवर चालक, आदी विविध सेवानिवृत्तांचा यामध्ये समावेश आहे.

 

कोरोनाविरोधाच्या लढाईसाठी लष्कराच्या आरोग्य विभागातील निवृत्त कर्मचारी केव्हाही सज्ज आहेत. त्यांतील ४९ जणांची यादी जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे. त्या सर्वांशी चर्चा झाली असून, त्यांनी यासाठी तयारी दर्शविली आहे.
- सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

Web Title: But the army's 'health retirees' will come in handy, too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.