गोकुळमध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात का..?मुश्रीफ यांची विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 13:17 IST2021-03-25T12:52:00+5:302021-03-25T13:17:55+5:30
Gokul Milk HasanMusrif Kolhapur- महाराष्ट्रात अनेक प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर भाजप सातत्याने विखारी टीका करत असून सरकार अस्थिर करण्याची व बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. गोकूळमध्ये अशा भाजपच्या मांडीला मांडी लावून शाहूवाडी तालुक्यातील शिवसेना कशी बसणार अशी विचारणा गोकुळ दूध संघातील विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी केली.

गोकुळमध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात का..?मुश्रीफ यांची विचारणा
कोल्हापूर : महाराष्ट्रात अनेक प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर भाजप सातत्याने विखारी टीका करत असून सरकार अस्थिर करण्याची व बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. गोकूळमध्ये अशा भाजपच्या मांडीला मांडी लावून शाहूवाडी तालुक्यातील शिवसेना कशी बसणार अशी विचारणा गोकुळ दूध संघातील विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी केली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपचा अध्यक्ष व जनसुराज्य पक्षाचे उपाध्यक्ष झाले. त्यावेळी शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेने विनाअट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. वास्तविक; त्यावेळी हे प्रश्न विचारले गेले पाहिजे होते असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील- सरूडकर यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान महाविकास आघाडीनेच केला असा दावाही मुश्रीफ यांनी केला आहे.
गोकुळमध्ये अगोदर सत्यजित पाटील यांनी विरोधी राजर्षि शाहू आघाडीस पाठिंबा दिला.आमदार विनय कोरे यांनीही याच आघाडीला पाठिंबा दिल्याने सरुडकर गटातून प्रतिक्रििया उमटली आहे.
कोरे गटाकडून पन्हाळ्यातून अमर पाटील व काँग्रेसकडून शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही उमेदवार विधानसभेला कोरे यांच्यासोबत राहतात. त्यामुळे गोकुळची ताकद मिळाल्यास आपल्या अडचणी वाढतील असे सरुडकर गटाला वाटते. त्यावरून धुसफूस सुरु आहे. या आघाडीत राहायचे की नाही याचा फेरविचार करावा असा दबाव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी हे स्पष्टीकरण केले आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणतात, सव्वा वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलांमध्ये सत्यजित पाटील यांचे प्रमुख सहकारी हंबीरराव पाटील,भेडसगावकर यांची जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व आरोग्य सभापतीपदी निवड करून महाविकास आघाडीने त्यांचा सन्मान केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेत कोणाच्यातरी चिथावणीला बळी पडू नये. सत्यजित पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील.