राज्यात दहा एमबीबीएस महाविद्यालयांना मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:00 IST2024-12-23T18:59:01+5:302024-12-23T19:00:39+5:30
पालकमंत्री पदाबाबत तीन नेते ठरविणार

राज्यात दहा एमबीबीएस महाविद्यालयांना मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची आपणावर दुसऱ्यांदा जबाबदारी दिल्याचा आनंद आहे. या माध्यमातून संबधित विभागातील प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयांसह रुग्णालयांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मंत्री मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खाते मिळाल्यानंतर ते बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण खाते माझ्याकडे होते. पण केवळ तेरा महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी अद्ययावत ११०० बेडचे रुग्णालय, बीएचएमएस, बीएएमएस, योगाचे महाविद्यालय मंजूर करून आणले आहे. ही सर्व कामे पूर्णत्वाकडे न्यायची आहेत. त्याचबरोबर राज्यात दहा ते अकरा एमबीबीएस शासकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. त्याचीही तयारी करायची आहे. आगामी काळात काळ मर्यादा निश्चित करून ही कामे पूर्ण करण्याचा मानस आहे.
आरोग्याचे प्रश्न सोडविण्यास मदत
जिल्ह्याला वैद्यकीय शिक्षणासह सार्वजनिक आरोग्य ही दोन महत्त्वाची खाती मिळाल्याबद्दल विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात अनेक वर्षांपासून आरोग्याचे काही प्रश्न आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी मदत होणार आहे.
पालकमंत्री पदाबाबत तीन नेते ठरविणार
कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून रस्सीखेच सुरू असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे काम करण्याची आमची सगळ्यांची तयारी असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.