प्रसंगी अध्यादेशाद्वारे पगारी पुजारी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:40 AM2017-09-12T00:40:25+5:302017-09-12T00:40:25+5:30

Appointment of paymaster by ordinance on occasion | प्रसंगी अध्यादेशाद्वारे पगारी पुजारी नियुक्ती

प्रसंगी अध्यादेशाद्वारे पगारी पुजारी नियुक्ती

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंबंधी सरकारची भूमिका ठाम आहे. त्याबाबतचा जिल्हाधिकाºयांचा अहवाल गुरुवारी शासनाच्या विधि व न्याय विभागाला सादर होणार आहे. त्याआधारे आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पगारी पुजारी नेमण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळास सादर होईल. मंत्रिमंडळाने मंजुरी दिली की डिसेंबर महिन्यात होणाºया हिवाळी अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर होईल; पण असे झाले नाही किंवा त्याला आव्हान दिले गेले तरी प्रसंगी राज्यपालांद्वारे अध्यादेश काढून यासंबंधीचा कायदा केला जाईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे दिली.
अंबाबाई मूर्तीला घागरा-चोली नेसविल्या प्रकरणानंतर सुरू झालेले अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ प्रकरण आता महत्त्वाच्या वळणावर आले आहे. याप्रश्नी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या एकसदस्यीय समिती पुढील सुनावणी प्रक्रियेचा अहवाल विधि व न्याय खात्याला सादर होणार आहे. दुसरीकडे शासनाच्याही स्वतंत्र समितीच्यावतीने देशभरातील मंदिरांचा अभ्यास करून पगारी पुजारी नेमण्यासंबंधी काय निर्णय घेता येईल यावर काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वंशपरंपरागत पुजाºयांनाच पान १ वरून)
पगारावर नेमले जाईल की नवीन पुजाºयांची नेमणूक होईल, त्यांना पगार दिला जाईल की, उत्पन्नातील टक्केवारी याबाबत चर्चा सुरूझाली आहे. या सगळ्या बाबींवर चर्चा करण्यासाठी सोमवारी अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत शासनाची भूमिका ठाम आहे. आता त्यातून माघार नाही. त्यावर निर्णय घेण्यासाठी देशात व राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पगारी पुजारी नेमण्यात आले आहे, त्यांना पगार दिला जातो की मंदिराच्या उत्पन्नाची टक्केवारी या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती काम करत आहे. मी स्वत: न्याय व विधि खात्याच्या अधिकाºयांनाही याचा अभ्यास करायला सांगितले आहे. जिल्हाधिकाºयांचा अहवाल आणि समितीच्या अभ्यासाअंती पगारी पुजारी नेमण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. हा प्रस्ताव आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली की डिसेंबरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनात त्याला कायदा म्हणून मंजुरी दिली जाईल. या प्रस्तावाला कोणाचाही विरोध होणार नाही, अशी अपेक्षा आहे; मात्र विरोध झालाच, त्याला आव्हान दिले गेले किंवा मंजुरी नाहीच मिळाली तर शासनाच्यावतीने राज्यपालांना अध्यादेश काढण्यासंबंधी विनंती केली जाईल; पण कोणत्याही परिस्थितीत कायदा केला जाईल. आम्ही कायदा इतका सक्षम करणार आहोत की, हे प्रकरण न्यायालयात गेले तरी कायद्याचे कलम आणि नियमांच्या कसोटीवर तो टिकेल.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, आर. के. पोवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी नगरसेवक राजू लाटकर, दिलीप पाटील, बाबा पार्टे, शरद तांबट उपस्थित होते.

--------------
पात्रता काय, पगार किती?
यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी व्यसनी, ज्यांच्यावर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत व ज्यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी आई श्री अंबाबाईच्या मूर्तीचा अवमान केला आहे अशांना पगारी पुजारी म्हणून नेमू नये, अशी मागणी केली तसेच देवीच्या गाभाºयात पोलीस प्रशासनाच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी केली. त्यावर चंद्रकांतदादांनी पुजाºयांची नेमकी पात्रता काय असावी, त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार द्यावा की आठव्या वेतन आयोगाप्रमाणे या सगळ्यावर अभ्यास सुरू आहे. कायदा करताना यावर निर्णय घेतला जाईल. गाभाºयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंबंधी मी माहिती घेऊन पोलीस प्रशासनाला तशी सूचना देईन.

ठाणेकर यांच्यासंबंधी..
नवरात्रौत्सवातील शेवटचे दोन दिवस श्रीपूजक अजित ठाणेकर यांचा वार आहे त्यावेळी त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल का? या प्रश्नाला पालकमंत्र्यांनी चौकशी करून सांगतो, असे सांगितले.

साडी स्वीकारण्यास हरकत नाही...
अंबाबाईला अष्टमीदिवशी तिरूपती देवस्थानकडून शालू अर्पण केला जातो. या शालूबाबत पालकमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, भक्ताने देवीला अर्पण केलेली साडी स्वीकारली जाते. त्यामुळे अन्य देवस्थाननेही श्रद्धेपोटी दिलेला शालू स्वीकारण्यास हरकत नाही.
नवरात्रौत्सव निर्विघ्न पार पडणार
दहा दिवसांवर नवरात्रौत्सव आला आहे. त्यानंतर दिवाळी आहे. सणांच्या या कालावधीत परस्थ: भाविक लाखोंच्या संख्येने कोल्हापुरात येतात. त्यांच्यापुढे अंबाबाई मंदिरासंबंधी कोणतेही वाद उत्पन्न होऊ नये किंवा आंदोलन होऊ नये यासंबंधीची काळजी घेण्यात यावी, असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले. त्यावर अशी काळजी घेण्याचे आश्वासन संघर्ष समितीने दिले.

Web Title: Appointment of paymaster by ordinance on occasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.