Kolhapur Municipal Election 2026: उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात, थंडीत राजकीय वातावरण तापणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:43 IST2025-12-22T13:42:19+5:302025-12-22T13:43:07+5:30
गल्लोगल्ली प्रचार पदयात्रा

Kolhapur Municipal Election 2026: उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात, थंडीत राजकीय वातावरण तापणार
कोल्हापूर : गळ्यात स्कार्प, हातात विकासकामांचे परिचय पत्र, कुठे फटाका फोडलेल्या, हालगीचा दणदणाट, हात जोडून मतदारांचे आशीर्वाद मागणारे उमेदवार आणि त्यांच्या मागून चालणारे पंचवीस - पन्नास कार्यकर्त्यांचा समूह अशा वातावरणात रविवारी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण ढवळून गेले. त्यामुळे प्रत्येक प्रभागात, प्रत्येक गल्लीबोळात उमेदवारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून नामनिर्देशनत्रे भरण्यास उद्या, मंगळवारपासून सुरुवात होत आहे. परंतु, निवडणूक लढवायची याचा पक्का निर्धार केलेल्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरेपर्यंत वाट न पाहता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातही शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टीचे असल्याने मतदार घरी भेटतील या अपेक्षेने अनेक उमेदवारांनी मोठ्या पदयात्रा काढल्या.
विविध राजकीय पक्षांचे स्कार्प गळ्यात अडकवून हालगीच्या दणक्यात उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते उमेदवारांची ओळख करून देणारी पत्रके घरोघरी वाटली जाऊ लागली आहेत. पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांना भेटण्यावर उमेदवारांनी जोर दिला आहे. रविवारी सायंकाळी पाचनंतर शहरातील अनेक प्रभागातील गल्ल्या, कॉलनी, प्रमुख चौक, रस्ते प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यापून गेले होते. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग राहिला.
या निवडणुकीत प्रचाराला कमी दिवस मिळणार आहेत, त्यामुळे उमेदवारी मिळेल न मिळेल यांचा विचार न करता उमेदवारांनी थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. बहुतांशी उमेदवारांच्या घर ते घर एक दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पक्षाचे चिन्ह मिळाल्यानंतर पुन्हा संपूर्ण मतदारसंघात दोन तीन फेऱ्यात पदयात्रा निघतील.
उद्या, मंगळवारपासून प्रत्यक्ष नामनिर्देशपत्रे भरण्यास सुरुवात होणार आहे. शहरातील वीस प्रभागांसाठी सात निवडणूक कार्यालये सुरू करण्यात आली असून, त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी अंतिम तयारीवर भर देताना दिसत आहेत. आचारसंहिता अंमलबजावणी करण्यासाठीची विविध पथकेही आता कार्यरत होतील. दि. ३१ डिसेंबरपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरता येणार आहेत.