भारत चव्हाण कोल्हापूर : अहमदाबादविमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अपर्णा अमोल महाडिक या कोल्हापुरात आल्या होत्या, त्यावेळी त्यांना वेळ कमी असल्याने निघून गेल्या. परंतु त्यांची पन्हाळा पहायची इच्छा असूनही तो पाहता आला नाही. जुलै महिन्यात त्या कोल्हापूरला पुन्हा येणार होत्या, त्यावेळचं त्यांनी पन्हाळ्याला जायचं निश्चित केले होते. दुर्दैवाने गुरुवारी त्यांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने पन्हाळा पाहण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.अपर्णा महाडिक यांचे पायलट पती अमोल हे गव्हर्मेंट सर्व्हंट बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र पंदारे यांचे भाचे होत. त्यामुळे अमोल यांच्याबरोबर अपर्णा कोल्हापूरला येत असत. पहिल्या भेटीतच त्यांना कोल्हापूर खूप आवडले होते. काही महिन्यापूर्वी ते दोघे कोल्हापूरला येऊन गेले. अपर्णा यांची अंबाबाई देवीवर श्रद्धा होती. त्या कोल्हापूरच्या भेटीत आवर्जून अंबाबाईच्या दर्शनासाठी जात असत.मागच्या भेटीत त्यांना पन्हाळा देखील पहायचा होता; पण वेळ नसल्याने त्यांना तिकडे जाता आले नाही. परंतु कोल्हापूर सोडत असताना त्यांनी पुढच्या भेटीत आपण पन्हाळ्याला जायचे असे ठरवूनच गेल्या. पुढील महिन्यात त्यांचे कोल्हापूरला येण्याचे ठरले होते. पन्हाळ्याला जायचे हेही त्यांनी कपिल पंदारे यांना सांगून ठेवले होते. दुर्दैवाने पन्हाळा पाहण्याची इच्छा अपूर्ण राहिली.महाडिक- पंदारे परिवार पर्यटनाच्या निमित्ताने गेल्याच महिन्यात लोणावळ्यात जमले होते. त्यावेळी कपिल पंदारे यांची मुलगी कु. देवीक हिने दहावीला चांगले मार्क मिळविल्याचे पाहून अपर्णा यांनी तिचे कौतुक केले होते. बारावीला देखील चांगला अभ्यास कर, चांगले मार्क मिळव. तुला एव्हीएशनमध्ये घ्यायची जबाबदारी माझी राहिल, असे अपर्णानी देवीकाला सांगितले होते. अपर्णा या खवय्या होत्या. त्यांना तांबड्या- पांढऱ्या रस्स्यासह कोल्हापुरी मटनाची भुरळ पडली होती. त्या आवडीने मटन खात होत्या, अशी आठवण रवींद्र पंदारे यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे सांगितली.
Ahmedabad Plane Crash: 'क्रू मेंबर' अपर्णा महाडिक यांची पन्हाळा पाहण्याची इच्छा अपूर्णच
By भारत चव्हाण | Updated: June 13, 2025 12:36 IST