समीर देशपांडे कोल्हापूर : महायुतीतील तीनही पक्षांना सोडून गेलेल्या आणि विरोधात निवडणूक लढवलेल्या कोणालाही परस्पर संमतीशिवाय घेऊ नये, या अलिखित नियमाने अनेकांची कोंडी केली आहे. एकीकडे पराभव झाल्यानंतर राज्यातील अनेकजण पुन्हा आपापल्या पक्षात परतून सत्तेचा लाभ घेण्यासाठी आग्रही असताना त्यांना सबुरीचा सल्ला दिला जात आहे. या सर्वांची कामे त्यांचे जुने नेते करत आहेत. परंतु पुन्हा प्रवेश मात्र धोरण बदलल्याशिवाय हाेणार नसल्याचे दिसते.महाविकास आघाडीच्या अडीच वर्षानंतर राज्यात भाजप शिंदेसेनेचे सरकार आणि नंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीही सोबत घेतली गेली. विधानसभेला अनेकांनी आपल्या पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने उद्धवसेना किंवा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. जे जिंकले त्यांची सध्या तरी काही अडचण नाही. परंतु जे पराभूत झालेत त्यांची कोंडी झाली आहे. एकीकडे आपला जुना नेता सत्तेत आहे, परंतु जाहीरपणे त्यांच्यासोबत जाता येत नाही अशी ही कोंडी झाली आहे.कारण महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच तूर्त पक्ष सोडून विरोधात लढलेल्यांना तातडीने पुन्हा पक्षात प्रवेश न देण्याबाबत एकमत झाले आहे. ज्या ठिकाणी उद्धवसेना किंवा शरद पवारांच्या पक्षातील कोणी येत असतील तर त्यांना घ्यायचे. परंतु सोडून या दोन्ही पक्षात गेलेल्यांना लगेच घ्यायचे नाही असे हे धोरण आहे.
कोल्हापूरमध्ये दोघांना प्रतीक्षाकागल मतदारसंघात राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी पक्ष सोडून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. ते पराभूत झाल्याने आता पुढे काय असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. पण त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. तर के. पी. पाटील यांनी शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही साथ सोडून उद्धवसेनेत प्रवेश केला. प्रकाश आबिटकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यांना हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जाहीरपणे अजित पवार यांच्यासोबत यायचे आहे. पण अलिखित नियम आड आला आहे.
अनेकांसमोर पेचसिंधुदुर्गमध्ये राजन तेली विधानसभेसाठी उद्धवसेनेत गेले. दीपक केसरकर यांच्याकडून पराभूत झाले. आता त्यांच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे. रत्नागिरीत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनीही पक्ष सोडला. सांगलीत रोहित पाटील यांच्याकडून पराभूत झालेले माजी खासदार संजयकाका पाटील भाजपच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहेत. साताऱ्यामध्ये संजीव नाईक निंबाळकर गट अजित पवार यांच्याशी जुळवून घेत आहे.
जिल्हा परिषदेवेळी प्रवेश शक्यमहानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या की हे पक्षप्रवेश होऊ शकतात. कारण या सर्वच ठिकाणी महायुतीला सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे महायुतीतील कोणत्याही पक्षात कोण जाईना आपलीच ताकद वाढेल असे गणित मांडून हे प्रवेश होऊ शकतात असे एका ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.