कोल्हापुरात आणखी एक सभागृह, आर्ट गॅलरी लवकरच साकारणार
By भारत चव्हाण | Updated: March 14, 2026 17:58 IST2026-03-14T17:57:48+5:302026-03-14T17:58:40+5:30
सभागृहाला ऐतिहासिक बाज

कोल्हापुरात आणखी एक सभागृह, आर्ट गॅलरी लवकरच साकारणार
भारत चव्हाण
कोल्हापूर : नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक परिसरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि आर्ट गॅलरीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, जास्तीत जास्त एक-दीड महिन्यात हे काम पूर्ण होऊन सभागृह व आर्ट गॅलरी सार्वजनिक वापरासाठी खुले होणार आहे. या सभागृहाला ऐतिहासिक बाज दिला गेल्याने असल्याने इमारत अतिशय देखणी झाली आहे.
कोल्हापूर शहरातील नर्सरी बाग परिसरात असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक-समाधी स्थळाच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात काही महत्त्वाची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि आर्ट गॅलरी उभारणी हा प्रमुख प्रकल्प आहे. सभागृहातील इलेक्ट्रीफिकेशन, अग्निप्रतिबंधक, तसेच वातानुकूलित यंत्रणा उभारण्यात आली असून, आता ॲकॉस्टीकचे (नैसर्गिक ध्वनी निर्माण करणारी यंत्रणा) काम सुरू आहे.
आर्ट गॅलरीचे संपूर्ण सिव्हील काम पूर्ण झाले असून, फक्त फरशी बसविणे बाकी आहे. महिला, पुरुष यांच्यासाठी प्रत्येकी चार-चार सीटचे स्वच्छतागृह, कम्पाउंडवॉल ही कामे पूर्ण झाली आहेत.
सभागृह पूर्णपणे वातानुकूलित असेल. तेथे एका वेळी २०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खुर्च्या खरेदी करण्यात आल्या असून, त्या बसविण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
प्रकल्पाचा उद्देश
राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी परिसराचा सांस्कृतिक व ऐतिहासिक विकास करणे.
सामाजिक न्याय, समता आणि शाहू-आंबेडकर विचार यांचे प्रदर्शन आणि जनजागृती करणे.
पर्यटक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण केंद्र तयार करणे.
प्रकल्पाचा खर्च
या कामासाठी सुमारे नऊ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर
निधी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासासाठी वापरण्यात आला आहे.
कामामध्ये समाविष्ट घटक
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह (कार्यक्रम व व्याख्यानांसाठी)
- आर्ट गॅलरी – शाहू महाराजांचे कार्य, सामाजिक चळवळी, इतिहास यांचे चित्र/शिल्प प्रदर्शन
- ऑडिओ-व्हिज्युअल प्रणाली (माहितीपट, डिजिटल सादरीकरण)
- परिसर सुशोभीकरण व कंपाऊंड वॉल
- वाहनतळ व्यवस्था
- स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधा