आणखी २२ मुलांवर उपचार--कुपोषण प्रश्न

By Admin | Updated: November 9, 2016 01:07 IST2016-11-09T01:08:33+5:302016-11-09T01:07:32+5:30

सर्व मुले आधार विद्यालयातील; पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रुग्णालयात राहणार

Another 22 children's treatment - malnutrition questions | आणखी २२ मुलांवर उपचार--कुपोषण प्रश्न

आणखी २२ मुलांवर उपचार--कुपोषण प्रश्न

कोल्हापूर : शित्तूर तर्फ मलकापूर येथील प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या आधार विद्यालय या निवासी शाळेतील आणखी २२ मुलांना उपचारासाठी मंगळवारी दुपारी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची सायंकाळी उशिरापर्यंत वैद्यकीय तपासणी सुरू होती. यातील मुलांची प्रकृती ठणठणीत होण्यासह त्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ती रुग्णालयात राहणार आहेत. संबंधित मुलांच्या उपचाराबाबत सीपीआर प्रशासनाची कार्यवाही वेगाने सुरू होती.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार दुपारी तीन वाजता बांबवडे आणि मलकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून या मुलांना सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. यामध्ये हरीश, संजना विश्वकर्मा, अश्विनी, रोशनी, स्मिता (बिल्ला एक), सुहास, आनंद, बडी गीता, नेहा बिल्ला (नंबर ८८), अंकित, पौर्णिमा, सौरभ, अर्जुन, रविना, आदित्य (बंटी), फातिमा (बडी), सुनीता वाघमारे, रत्ना, विकास भोसले, सुरेश, हृतिक यांचा समावेश आहे. या मुलांची बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे शाळेमध्ये हिमोग्लोबिन आणि रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना ‘सीपीआर’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात बारा वर्षांखालील १२ आणि त्याखालील वयाच्या दहा मुला-मुलींचा समावेश आहे. या ठिकाणी आणल्यानंतर त्यांना बालरोग कक्षामध्ये ठेवण्यात आले. येथे त्यांची रक्त, हिमोग्लोबिन, रक्तदाब, आदी स्वरूपातील वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांच्यावर गरजेनुसार आवश्यक ते उपचार करण्यात येत होते. दरम्यान, याबाबत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, या निवासी शाळेतून गेल्या दोन दिवसांसह मंगळवारपर्यंत ३५ मुले-मुली उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. प्राथमिक स्वरूपातील तपासणीनंतर त्यांच्यावर गरजेनुसार उपचार केले जात आहेत. उपचारानुसार यातील मुला-मुलींना मेडिसिन, बालरोगकक्ष आणि सर्जरी विभागात ठेवले आहे. काही मुलांना खरुजेचा त्रास आहे. आहारतज्ज्ञांच्या माध्यमातून या मुलांचा आहार निश्चित केला जाणार आहे. दर तासाला त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात येत आहे. संबंधित मुलांची प्रकृती ठणठणीत होण्यासह त्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ती रुग्णालयात राहणार आहेत. यासाठी वॉर्डबॉय, परिचारिका, आदी ५० कर्मचारी कार्यरत आहेत. उपचारासाठी दाखल झालेली मुले आणि त्यांचे केअरटेकर अशा ५० जणांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

मुलांसाठी जेवण, दुधाची व्यवस्था
‘सीपीआर’ला आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन उपचारासाठी दाखल झालेल्या मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. या ठिकाणी संबंधित मुलांना जॅकेट, शाल यांचे वाटप केले. तसेच या मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंत जेवण, दूध, अंडी आणि प्रोटिन पावडर देण्याची व्यवस्था केली. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, शेखर कुसाळे, शशिकांत भालकर, आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे, बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील यांनी या मुलांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांना सफरचंदाचे वाटप केले. यावेळी राणोजी चव्हाण, रोहित पाटील, अवधूत अपराध, आप्पा देसाई, आदी उपस्थित होते. महाद्वार रोड परिसरातील दगडू ग्रुपने या मुलांच्या जेवणासाठी प्लास्टिकच्या प्लेट्स, बाऊल तसेच काही खेळणी दिली.

मने हेलावली
दुपारी तीनच्या सुमारास संबंधित मुला-मुलींना ‘सीपीआर’मध्ये आणण्यात आले. यातील बहुतांश मुलांना नीट बोलतादेखील येत नाही. रुग्णवाहिकेतून त्यांचे येणे, रुग्णालयाच्या परिसरात आपापल्या साहित्याच्या पिशव्या घेऊन थांबणे. बालरोगकक्षातील त्यांचे वर्तन, आदी पाहून उपस्थित अन्य रुग्ण, त्यांचे नातेवाईक आदींची मने हेलावून गेली. काहीजणांकडून हळहळ व्यक्त होत होती. मुले दाखल झाल्यापासून या मुलांची ‘सीपीआर’च्या कर्मचाऱ्यांनी ममतेने व आपुलकीने सेवाशुश्रूषा केली.


धुळ्याची मुले शाहूवाडीत आली कशी?
कोल्हापूर : मानखुर्द, मुंबई येथील बालकल्याण समितीने धुळे जिल्ह्यातील एका स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केलेली मुले शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथे आली कशी, याचे कोडे समाजकल्याण विभागाला पडले आहे. याबाबतची कोणतीच अधिकृत कागदोपत्री माहिती अजूनही समोर न आल्याने आता याबाबतही रेकार्ड तपासण्यात येत आहे.
शित्तूर तर्फ मलकापूर येथील पंचरत्न राजपाल यांनी आपल्या प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून अपंग, अस्थिव्यंग आणि मतिमंद अशा तीन शाळा चालविल्या होत्या. २०१४ पर्यंत या शाळांना मान्यता होती. मात्र त्यानंतर मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही.
अधिक माहिती घेता मानखुर्द मुंबई येथील बालकल्याण समितीने दहा ते बारा मूकबधिर मुले धुळे जिल्ह्यातील कपडाणे या गावातील द्वारकाबाई डीफ अ‍ॅँड म्युट चिल्ड्रेन रिहॅबिलिटेशन स्कूलकडे संगोपनासाठी अधिकृतपणे दिली आहेत. याबाबतचे पत्रही चौकशीत उपलब्ध झाले आहे. मात्र, ही मुले राजपाल यांच्या शाळेत कशी आली, याबाबत अधिकृत कोणतीच माहिती मिळाली नाही. धुळे जिल्ह्यातील संस्थेला दिलेली मुले शाहूवाडी तालुक्यात कशी आणली गेली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


संस्थांकडून निषेध
शित्तूर तर्फ मलकापूर येथील सर्व प्रकारचा आणि मुलांची करण्यात आलेली हेळसांड याचा जिल्ह्यातील अनुदानित संस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात या संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत निषेध नोंदविला. यावेळी राजेंद्रसिंह घाटगे कर्णबधिर शाळा, कागलचे सुहास कुरुकले, चैतन्य गडहिंग्लजचे साताप्पा कांबळे, अंधशाळा कोल्हापूरचे आनंद आवळे, अवधूत मतिमंद विद्यालय, अंबपच्या स्वाती गोखले, लोहिया मूकबधिरचे सुरेश टोणपे, रोटरी कर्णबधिर तिळवणीचे दीपक मोहाडीकर, जिज्ञासा कोल्हापूरचे विशाल झोडे उपस्थित होते.


‘त्या’ बालकांच्या आरोग्याला प्राधान्य हवे : अतुल देसाई
कोल्हापूर : मलकापूरपैकी शित्तूूर येथील निवासी संस्थेमधील या बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याची सोय करणे सध्या आवश्यक आहे, असे मत आभास फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेचे अध्यक्ष अतुल देसाई यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.
ते म्हणाले, या संस्थेमध्ये बालकांचे कुपोषण ही बाब बालहक्कांच्या विरोधी असून, आठ दिवसांवर बालदिन असताना संंस्थेत संगोपनातील निष्काळजीपणामुळे एका बालकांस जीव गमवावा लागला. तर काही बालकांना कुपोषणातून आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. दुसरीकडे एक बालक भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले आहे.
या प्रकरणातील संस्थेला अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे यांची २0१४ पर्यंत मान्यता होती, तर सामाजिक न्याय विभाग नियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्यासाठी जबाबदार आहे. ही निवासी शाळा असल्याने या शाळेतील बालकांच्या आरोग्याची तपासणी आरोग्य विभागाने करणे अपेक्षित होते. आता या संस्थेमध्ये ही बालके मुंबई शहर, आणि मुंबई उपनगर येथून आलेली असल्याने यामध्ये महिला आणि बालविकास विभाग सहभागी झाला आहे. त्यामुळे या विविध मुद्यांवर एकत्रितपणे चौकशी होण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करावी, यासाठी आम्ही आभास फाउंडेशनने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांना निवेदन दिले.


नागरिकांचेही सामाजिक उत्तरदायित्व हवे...
बालकांच्या विविध समस्या वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने समोर येत असतात, अशा परिस्थितीत अनाथ बालकांच्या काळजी, संरक्षण आणि संगोपनाची अंतिम जबाबदारी ही शासनाचीच असते. सध्याच्या योजना, निधी, पुरेसा आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, भौतिक सुविधा यासंदर्भात शासनाने हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. पण केवळ शासनाच्या कमतरता आणि मर्यादा ओळखून समाजातील नागरिकांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मुलांसाठीच्या निवासी संस्थांमध्ये भेटी दिल्या पाहिजेत. तिथल्या मुलांशी संवाद साधला पाहिजे, संस्थेत काही कमी पडत असल्यास देणगीसाठी पुढे आले पाहिजेत. समाज सजग असेल तर या घटनांना वचक बसेल.

Web Title: Another 22 children's treatment - malnutrition questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.