Kolhapur: ‘अण्णा’हत्तीचा वावर; चंदगड परिसरात घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:51 IST2025-12-19T15:50:29+5:302025-12-19T15:51:34+5:30
चंदगड : तालुक्यात पुन्हा ‘अण्णा’ हत्तीचे आगमन झाले असून, पाटणे वनविभाग हद्दीत ‘अण्णा’ हत्तीचा वावर आहे. कलिवडे परिसरात कांबळे ...

Kolhapur: ‘अण्णा’हत्तीचा वावर; चंदगड परिसरात घबराट
चंदगड : तालुक्यात पुन्हा ‘अण्णा’ हत्तीचे आगमन झाले असून, पाटणे वनविभाग हद्दीत ‘अण्णा’ हत्तीचा वावर आहे. कलिवडे परिसरात कांबळे वाड्याजवळ अचानक टस्कर समोर आला होता त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. त्यावर वन विभागाने सतर्क होत हत्तीवर नजर ठेवून आहे.
सध्या तो पार्ले भागात असून, दोडामार्ग येथून चंदगड मार्गे बुझवडे आणि तिथून पाटणे वनविभाग हद्दीत त्याची एन्ट्री झाली आहे. सध्या हा हत्ती पार्ले येथे असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्यावर वनविभाग लक्ष ठेवून आहे. अद्याप नुकसानीची नोंद झालेली नसून जंगल क्षेत्रालगत गावातील शेतकरी, ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांनी केले आहे.
जंगलातून अन्नाच्या शोधात हत्ती गावाकडे येण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. मानव-हत्ती संघर्षही तीव्र होत आहे. कलिवडे परिसरात हत्ती आढळल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाला त्वरित माहिती दिली. सध्या हा हत्ती पार्ले भागात असून, त्याच्या हालचालींवर हकारा गटातील कर्मचारी नजर ठेवून आहेत.