मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविल्याचा राग, तरुणास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 13:23 IST2019-08-19T13:21:43+5:302019-08-19T13:23:10+5:30
मोबाईलवरून मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविल्याप्रकरणी चौघांनी काठीने केलेल्या मारहाणीत योगेश सिद्धार्थ कांबळे (वय २५ रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर) हा जखमी झाला.

मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविल्याचा राग, तरुणास मारहाण
कोल्हापूर : मोबाईलवरून मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविल्याप्रकरणी चौघांनी काठीने केलेल्या मारहाणीत योगेश सिद्धार्थ कांबळे (वय २५ रा. माळ्याची शिरोली, ता. करवीर) हा जखमी झाला.
हा प्रकार पुईखडी येथील एका मंगल कार्यालयापाठीमागे १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संशयित श्रीधर कांबळे (रा. हळदी), धीरज कांबळे, अरविंद कांबळे, राकेश कांबळे (सर्व रा. सडोली खालसा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
करवीर पोलिसांनी सांगितले की, योगेश कांबळे हा इंडियन बुल्स कंपनीच्या मोबाईल अॅपवरून आॅनलाईन फायनान्स मंजुरीचे काम करतो. श्रीधर कांबळे यांना कर्जाची गरज असल्याने त्यांची ओळख संशयित योगेश याच्याबरोबर झाली. या ओळखीतून त्याने श्रीधर यांच्याकडून मोबाईल क्रमांक घेतला होता.
या मोबाईलवरून तो त्यांच्या मुलगीसोबत एसएमएसद्वारे चॅटिंग करू लागला. त्याने मुलीला प्रेमाचे एसएमएस पाठविले. हा प्रकार घरी कळल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी संशयित चौघांनी त्याला पुईखडी येथे बोलावून घेतले. त्याला मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून एका मंगल कार्यालयापाठीमागे नेऊन काठीने मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.