देवळात, समाजमंदिरात भरतात अंगणवाडी; कोल्हापूर जिल्ह्यात १४४३ जागी इमारती नाहीत, तालुकानिहाय स्थिती..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:46 IST2025-09-05T12:45:51+5:302025-09-05T12:46:21+5:30
शिजवूनच आणला जातोय पोषण आहार

संग्रहित छाया
कोल्हापूर : जिल्ह्यातील ३ हजार ९१५ अंगणवाड्यांपैकी २ हजार ४७२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती आहेत. १४४३ अंगणवाड्यांना इमारती नाहीत. परंतु तरीही उघड्यावर कुठे अंगणवाडी भरते असे कुठेही चित्र नाही. खासगी, भाड्याने घेतलेल्या जागा, मंदिर, समाजमंदिर, ग्रामपंचायत मालकीच्या इमारती आणि प्राथमिक शाळांमध्ये १४४३ अंगणवाड्या भरवल्या जात आहेत.
चार हजार अंगणवाड्यांत एक लाख बालके
जिल्ह्यातील ३ हजार ९१५ अंगणवाड्यांमध्ये १ लाख ४५ हजार ८५७ मुले, मुली असून त्यांच्या पोषण आहाराचीही दक्षता घेतली जाते.
स्वत:च्या जागेत २४७२ अंगणवाड्या
लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे दरवर्षी अंगणवाडी इमारतींसाठी निधी मंजूर करण्यात येतो. त्यामुळे तब्बल २ हजार ४७२ अंगणवाड्या या मालकीच्या इमारतीमध्ये भरवण्यात येतात.
कुठे भरवल्या जातात अंगणवाड्या?
उर्वरित १४४३ अंगणवाड्या या भाड्याच्या जागेत, प्राथमिक शाळा खोल्या किंवा व्हारांडा, देवूळ किंवा समाजमंदिरात भरवण्यात येतात.
उघड्यावर कुठेही अंगणवाडी नाही
जिल्ह्यात कुठेही अंगणवाडी उघड्यावर भरवली जात नाही. भाड्याच्या जागा असल्या तरीही मुला-मुलींना सोयीचे होईल अशाच ठिकाणी निवडण्यात आल्या आहेत.
शिजवूनच आणला जातोय पोषण आहार
संबंधित ठेकेदार हा घरून शिजवूनच पोषण आहार आणत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुठेही अंगणवाडीच्या आवारात उघड्यावर आहार शिजवला असे होत नाही.
टॉयलेट अस्वच्छ
काही ठिकाणी टॉयलेट अस्वच्छ असल्याचे पहावयास मिळते. या स्वच्छतेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ किंवा आर्थिक तरतूद नसल्याचा हा परिणाम आहे.
कोणत्या तालुक्यात किती अंगणवाड्या
तालुका - अंगणवाड्या - स्वत:ची इमारती
करवीर १ - २२५ - १७१
करवीर २ - २०९ - १२६
हातकणंगले - २०५ - ११४
हातकणंगले २ - १४९ -७६
शिरोळ - १८५ -१०३
शिरोळ २ - १९८ -१०८
गगनबावडा - ८५ - ७७
आजरा - २०९ - १४५
भुदरगड - २७० - १५९
चंदगड - २९६ - १७२
गडहिंग्लज - २८७ - १७७
कागल - ३१५ - २१४
पन्हाळा - ३४७ - २१४
राधानगरी - ३३८ - २४१
शाहूवाडी - ३२५ - २०४
कोल्हापूर ग्रामीण - २७२ - १७१
एकूण - ३९१५ - २४७२