अंगणवाडी सेविकांना मिळणार लाडक्या बहिणींचा भत्ता, कोल्हापूर जिल्ह्याला किती मिळाला निधी.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:22 IST2025-03-20T17:22:18+5:302025-03-20T17:22:38+5:30
चारचाकीवाल्या महिलांचा आकडा फुगला

अंगणवाडी सेविकांना मिळणार लाडक्या बहिणींचा भत्ता, कोल्हापूर जिल्ह्याला किती मिळाला निधी.. वाचा
कोल्हापूर : लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यात मोलाचा वाटा निभावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अखेर योजनेचा भत्ता पुढील आठ दिवसांत मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला दीड कोटीचा निधी आला आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर प्रत्येक अर्जाला ५० रुपये याप्रमाणे रक्कम वर्ग केली जाणार आहे.
निवडणुकीच्या ताेंडावर राज्य शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना राबविण्याची मुख्य जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे दिली गेली. त्या-त्या भागातील अंगणवाडी सेविकांनी तेथील महिलांचे अर्ज सुरुवातीला ऑफलाइन व नंतर ऑनलाइन पद्धतीने भरले. अधिकाधिक महिलांचे अर्ज भरले जावेत, यासाठी शासनाने प्रत्येक अर्जामागे ५० रुपये असा भत्ता जाहीर केला. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले.
एका सेविकेने एक ते दीड हजार अर्ज भरले आहेत. लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांतच लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे मिळायला सुरू झाले; पण अर्ज भरण्याचे महत्त्वाचे काम केलेल्या अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित होत्या. त्यांना गेली आठ महिने भत्ता मिळालेला नाही. अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.
शासनाकडून जिल्ह्यासाठी दीड कोटीचा निधी आला असून, तो जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे वर्ग झाला आहे. याचे बिल सध्या कोषागार कार्यालयाकडे गेले आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवडाभरात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर त्यांनी भरलेल्या अर्जांच्या संख्येनुसार रक्कम वर्ग केली जाईल.
चारचाकीवाल्या महिलांचा आकडा फुगला
निकषात बसत नसलेल्या चारचाकी वाहन असलेल्या १४ हजार लाडक्या बहिणींची यादी राज्य शासनाने महिला बालविकास विभागाला पाठवली होती. या महिलांच्या घरोघरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहेत. तसेच आरटीओकडेदेखील याची एक यादी पाठवण्यात आली आहे. मात्र, यादीमध्ये त्रुटी असून काही महिलांची नावे वारंवार यादीत आली आहेत. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांचा आकडा फुगला आहे. ही बाब विभागाने राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यादीची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. ताेपर्यंत तरी लाभार्थी महिलांची चौकशी होणार नाही.