गैरसोयीच्या बदल्यांविरोधात अंगणवाडी कर्मचारी संघाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:25+5:302021-01-13T05:04:25+5:30
कोल्हापूर : गैरसाेयीच्या बदल्यांविरोधात अंगणवाडी कर्मचारी संघाने राज्याच्या महिला बालकल्याणमंत्र्यांसह एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांचे दार ठोठावूनही न्याय मिळाला ...

गैरसोयीच्या बदल्यांविरोधात अंगणवाडी कर्मचारी संघाचे आंदोलन
कोल्हापूर : गैरसाेयीच्या बदल्यांविरोधात अंगणवाडी कर्मचारी संघाने राज्याच्या महिला बालकल्याणमंत्र्यांसह एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांचे दार ठोठावूनही न्याय मिळाला नसल्याने आज बुधवारपासून प्रशासकीय इमारतीतील बालविकास प्रकल्पाच्या कार्यायासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू होत आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना बदलीचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक शासन निर्णय करावा, असा निर्णय होईपर्यंत थेट नियुक्ती व नेमणुकीची प्रक्रिया स्थगित करावी, अशी प्रमुख मागणी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अतुल दिघे, सुवर्णा तळेकर यांनी महिला व बालविकासमंत्री यशाेमती ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात कोल्हापूर शहर प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांची राहत्या घरापासून लांब बदली झाल्याने होणारा प्रवास खर्च, वाया जाणारा वेळ आणि मनस्ताप याकडे लक्ष वेधले आहे. फुलेवाडीतील अंजना गाेंधळी यांची बदली दौलतनगरला, कसबा बावडा येथील मदतनीस माया पोवार यांची बदली राजारामपुरी जागृतीनगर आणि कसबा बावडा येथील मदतनीस इंदुमती ठोंबरे यांना दौलतनगर येथे नियुक्ती दिली गेली. पदोन्नतीने या नियुक्त्या दिल्या गेल्या असल्यातरी त्यांच्या राहत्या घरापासून बऱ्याच लांब आहेत. त्यामुळे त्यांना नजीकच्या अंगणवाडीत नियुक्ती देण्याचे धोरण आखण्याची गरज असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. हे पत्र आठ दिवसांपूर्वी पाठवूनदेखील त्याचे उत्तर न आल्यानेच सोमवारी एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. तरीही दखल न घेतल्यानेच आज बुधवारपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात होणार आहे.