अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: September 3, 2016 00:59 IST2016-09-03T00:41:14+5:302016-09-03T00:59:30+5:30
जिल्हा परिषद : जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने शुक्रवारी संपात सहभागी होत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना देऊन त्यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली.
महावीर उद्यानाजवळून दुपारी
१२ नंतर मोर्चास सुरुवात झाली. आपल्या मागण्यांसाठीच्या घोषणा देत मोर्चा जि.प.वर धडकला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावानेही घोषणा देण्यात आल्या. दरमहा १८ हजार रुपये वेतन मिळावे, तीन हजार निवृत्तिवेतन मिळावे, केंद्र शासनाने सेविका व मदतनिसांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या केल्या.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून आलेल्या शिष्टमंडळाला याबाबतच्या भावना शासनाला कळवण्याचे आश्वासन दिले. आप्पा पाटील, जयश्री पाटील, कॉ. सरिता पाटील, कॉ. अर्चना पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
‘एनआरएचएम’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
कोल्हापूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत अधिकारी व कर्मचारी महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.पुढील वर्षी हे अभियान बंद होणार आहे. तेव्हा या कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष रिक्त पदांवर बिनशर्त समायोजन करावे, समायोजन होईपर्यंत समान काम, समान वेतन हे धोरण राबवावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार व निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.